बीड : बीडच्या केजमधील ‘लोकनेते गोपीनाथराव मुंडे मागासवर्गीय सहकारी सूतगिरणी’ची नोंद करताना बनावट सह्या केल्याप्रकरणी भाजपच्या माजी आमदार संगिता ठोंबरे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. केज कोर्टाचा निकाल अंबाजोगाई जिल्हा आणि सत्र न्यायालयाने कायम ठेवल्याने ठोंबरे दाम्पत्य कात्रीत सापडलं आहे. (BJP Ex MLA Sangita Thombare Forge Case)
लोकनेते गोपीनाथराव मुंडे मागासवर्गीय सहकारी सूत गिरणीच्या संस्थापक अध्यक्ष असलेल्या माजी आमदार संगिता ठोंबरे आणि त्यांचे पती विजय ठोंबरे यांनी सहकारी सूतगिरणीची नोंद करताना, बनावट प्रस्ताव तयार करुन तो ‘प्रादेशिक उपसंचालक वस्त्रोद्योग, औरंगाबाद’ आणि ‘संचालक वस्त्रोद्योग, नागपूर’ यांच्याकडे दाखल केला. यात गनपती सोनाप्पा कांबळे यांना सूतगिरणीचे संचालक दाखवून त्यांच्या नावासमोर बनावट सह्या करुन प्रस्ताव दाखल केला होता.
सदर आर्थिक व्यवहारात आपला काहीही संबंध नसून पुराव्यादाखल गनपती कांबळेंनी आपल्या खोट्या सह्या केल्याचा फॉरेन्सिक तज्ज्ञांचा अहवाल आणि शपथपत्र जोडून तक्रार दिली होती. यावरुन केजच्या प्रथमवर्ग न्यायालयाने संगिता ठोंबरे आणि विजयप्रकाश ठोंबरे यांच्याविरोधात फसवणुकीसह इतर कलमांच्या अंतर्गत गुन्हा नोंदवला. चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे आदेशही कोर्टाने दिले होते.
गणपती नव्हे, गनपतीच
गनपती कांबळे यांच्या संमतीशिवाय त्यांना सूतगिरणी संचालकपदी नेमण्यात आलं. शिवाय त्यांच्या बनावट सह्या करताना ‘गणपती’ असा उल्लेख करण्यात आला. ‘न’ लिहिताना चूक झाली आणि ठोंबरे दाम्पत्याचा खोटेपणा समोर आणण्यास कांबळेंना मदत झाली. कांबळे यांच्या खऱ्या स्वाक्षरीत ‘गनपती’मध्ये ‘न’ असल्याचं अधोरेखित करत फॉरेन्सिक हस्ताक्षर तज्ज्ञांनी सूतगिरणीच्या विविध कागदपत्रांवरील गनपती कांबळेंची स्वाक्षरी खोटी असल्याचा निर्वाळा दिला.
दरम्यान, केज न्यायालयाच्या आदेशाच्या विरोधात ठोंबरे दाम्पत्याने अंबाजोगाई जिल्हा सत्र न्यायालयात स्थगिती मगितली होती. परंतु तो आदेश अंबाजोगाई जिल्हा सत्र न्यायालयाने कायम ठेवल्याने ठोंबरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. (BJP Ex MLA Sangita Thombare Forge Case)