नाशिक : आगामी नाशिक महापालिका निवडणुकांच्या तोंडावर पक्षांतराचे वारे जोरदार वाहू लागले आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या उपस्थितीत भाजप महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी शिवबंधन हाती बांधले. भाजपच्या तब्बल 50 महिला कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. (BJP Female activists joins Shivsena in Nashik in presence of Sanjay Raut)
“नाशिकमध्ये शिवसेनेचा महापौर, आमचं ठरलंय”
सत्ताधारी पक्षाच्या कार्यालयात आल्यासारखं वाटतंय, अशा भावना संजय राऊत यांनी व्यक्त केल्या. काल राष्ट्रवादीचे नेते तसेच अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याशी भेट झाली. महापालिकेविषयी चर्चा झाली, ती इथे कशी सांगणार, असं राऊत म्हणाले. नाशिकमध्ये शिवसेनेचा महापौर, आमचं ठरलंय, असा निर्धारही राऊतांनी व्यक्त केला.
“राज्यपाल आणि सरकारचं खुलं युद्ध”
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे राजकीय दबावाखाली काम करत आहेत. राजभवनाचा वापर राजकारणासाठी होतोय, असा आरोप संजय राऊत यांनी केला. राजकारणात कोणीही कोणाचा कायमचा शत्रू नाही. राज्यपाल आणि सरकारचं शीत युद्ध नाही तर खुलं युद्ध आहे, असंही राऊत म्हणाले.
“पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची चौकशी होणार”
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय की पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची योग्य चौकशी होईल. यात जे कुणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. चौकशीतून सत्य समोर येईल. मुख्यमंत्री कुणालाही पाठीशी घालणार नाहीत, असं रोखठोक मत संजय राऊत यांनी मांडलं.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. मंत्री संजय राठोड यांचं नाव या प्रकरणी चर्चेत आहे. चौकशीतून सत्य बाहेर येईल. राजकारणात एखाद्याचा बळी घ्यायचा, त्याची बदनामी करायची, चारित्र्यहनन करायचे, असे प्रकार वाढले आहेत, संजय राठोड हे अनेक वर्ष राजकारणात आहेत. राठोड हे विदर्भातील शिवसेनेचा आधारस्तंभ आहेत, त्यांच्या समाजातील सर्वोच्च नेते आहेत, असं राऊत म्हणाले.
सानप गेल्याची उणीव भरून काढणार?
माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. सानप हे पंचवटी परिसरात राहतात. या भागाचं त्यांनी प्रतिनिधित्व केलं असून पंचवटीत त्यांचा दबदबा आहे. या परिसरातून 24 नगरसेवक निवडून जातात. नाशिकचा महापौर ठरवण्यामागे पंचवटीची नेहमीच मोठी भूमिका राहिली आहे. सानप यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने शिवसेनेला किमान 15 जागांवर नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळेच सानप यांनी पक्ष बदलल्याचा वचपा काढण्यासाठीच शिवसेनेने नाशिकमध्ये फिल्डिंग लावली आहे.
संबंधित बातम्या :
सानपांचा वचपा काढण्यासाठी राऊतांचा नाशिक दौरा; भाजपचे दोन बडे नेते फोडणार?
(BJP Female activists joins Shivsena in Nashik in presence of Sanjay Raut)