चंदीगड : हरियाणा विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली (BJP First Candidate List). या यादीत विधानसभेच्या 78 जागांसाठी निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. हरियाणात विधानसभेच्या एकूण 90 विधानसभेच्या जागा आहेत (Haryana Assembly Elections).
पैलवान योगेश्वर दत्तला (Yogeshwar Dutt) भाजपने बडोदा विधानसभेच्या जागेवरुन तिकीट दिलं आहे. तर माजी हॉकी कर्णधार संदीप सिंह (Sandip Singh) हे पिहोवा मतदारसंघातून विधानसभा लढवणार आहे. भाजपने कुस्तीपटू बबिता फोगाटला (Babita Fogat) दादरी मतदारसंघातून विधानसभेचं तिकीट दिलं आहे. तर, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर (Manohar Lal Khattar) यांना करनाल मतदारसंघातून विधानसभेचं तिकीट देण्यात आलं आहे.
महत्त्वाच्या मतदारसंघात भाजपचे उमेदवार
भाजपने अंबाला कॅन्ट या मतदारसंघातून अनिल वीज, जगाधारी मतदारसंघातून कंवरपाल गुर्जर, यमुना नगर मतदारसंघातून घनश्याम दास अरोरा, शाहाबाद मतदारसंघातून कृष्ण बेदी, कॅथल मतदारसंघातून लीलाराम गुर्जर, नीलोखेडी मतदारसंघातून भगवान दास, इंद्री मतदारसंघातून राजकुमार कश्यप, राई मतदारसंघातून मोहन लाल कौशिक आणि सोनीपत मतदारसंघातून कविता जैन यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
हरियाणा विधानसभा निवडणूक 2019 साठी 21 ऑक्टोबरला मतदान पार पडेल. 24 ऑक्टोबरला मतमोजणी होईल. यंदाच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस आणि जेजेपी असं चित्र पाहायला मिळेल. सर्वच राजकीय पक्ष विधानसभा निवडणुकांच्या तयारिला लागले आहेत. त्यासाठी नेत्यांचा प्रचारही सुरु झाला आहे.