विधान परिषदेच्या दहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत कॉंग्रेसच्या सहा आमदारांची मते फुटल्याचा आरोप करण्यात आला होता. यामध्ये जळगावातील रावेरचे काँग्रेसचे आमदार शिरीष चौधरी यांच्या नावाचीही चर्चा होती. मात्र, आमदार शिरीष चौधरी यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका स्पष्ट केली. 1931 पासून आमचे कुटुंब काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ आहे. मी गद्दारी करणार नाही. फुटलेल्या आमदारांमध्ये माझे नाव घेऊन माझी बदनामी करून स्वतःची पोळी भाजण्याचा हा प्रकार असल्याची टीका आमदार शिरीष चौधरी यांनी केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याशी संपर्क झालेला नाही. मात्र, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, माजी मंत्री सतेज पाटील आणि इतर नेत्यांसोबत बोलणे झाले आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.
विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलै रोजी निवडणूक झाली. या निवडणुकीमध्ये महायुतीचे 9 उमेदवार निवडून आले. तर, महाविकास आघाडीचे तीनपैकी दोन उमेदवार निवडून आले. कॉंग्रेसकडे अतिरिक्त मते असतानाही महाविकास आघाडीचे जयंत पाटील यांचा पराभव झाला. तर, भाजपने या विजयावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसची सहा मते फुटल्याचा दावा केला होता.
कॉंग्रेसच्या फुटलेल्या आमदारांमध्ये काँग्रेसचे रावेरचे आमदार शिरीष चौधरी यांच्याभोवती संशयाची सुई फिरत होती. मात्र, आमदार शिरीष चौधरी यांनी यावर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी फूटलेल्या आमदारांचे नाव जाहीर करून सत्य काय ते जनतेसमोर मांडावे अशी मागणी केली.
भाजप खासदार अशोक चव्हाण आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या जवळचा असल्यामुळे मी फुटलो असा आरोप केला जात आहे. मात्र, या गोष्टीत कुठलेही तथ्य नाही. पाच, दहा कोटी रुपयांसाठी त्यांच्या पाया पडायचे म्हणजे हा राजकीय आत्मघात आहे असे शिरीष चौधरी यांनी म्हटलं आहे.
गेल्या वेळीही मी भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र, भाजपमध्ये जाण्याचे कुठ्लेळी कारण माझ्याकडे नाही. अनेक पिढ्यांपासून आम्ही काँग्रेस विचारसरणी सोडली नाही. त्यामुळे यापुढेही त्याच विचारसरणीसोबत रहाणार आहे. स्वतःच्या थोड्याशा फायद्यासाठी भाजपची टोपी डोक्यावर घालणार नाही. जे मिळवायचे आहे ते काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मिळवू. काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून नाही मिळाले तर घरी बसू. मात्र, भाजपमध्ये कदापि जाणार नाही, असे स्पष्टीकरणही आमदार शिरीष चौधरी यांनी दिले.