मुंबई: राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (nawab malik) यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आमचा उद्या मुंबईत मोर्चा निघणार आहे. पोलिसांनी उद्याच्या मोर्चाला परवानगी नाही दिली तरी परवानगी झुगारून मोर्चा काढला जाईल, असं सांगतानाच सरकारला नवाब मलिकांचा राजीनामा घ्यावाच लागेल. मलिकांचा राजीनामा का घेतला जात नाही. त्यांचा राजीनामा न घेण्याबाबत कुणाचा दबाव होता का? कदाचित मलिक यांचा राजीनामा घेऊ नये म्हणून दाऊदचा दबाव असेल असा माझा अंदाज आहे, असा खोचक टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी लगावला. मी जेवढं उद्धव ठाकरेंना (cm uddhav thackeray) ओळखतो त्यानुसार त्यांनाही मलिक यांचा राजीनामा घ्यायचा असेल. पण त्यांच्यावर दबाव आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. मीडियाशी संवाद साधत असताना त्यांनी हा टोला लगावला.
नवाब मलिक यांचा राजीनामा घेण्यासाठी उद्या मोर्चा काढण्यात येणार आहे. काहीही झाले तरी उद्या भाजपचा मोर्चा निघणारच. परवानगी मिळो अथवा न मिळो. मोर्चा काढणारच, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. युवा सेनेचे पदाधिकारी राहुल कनाल यांच्या घरावर आयकर विभागाने छापे मारले आहेत. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. मी आधीच म्हणालो होतो, काहीजण सुपात आहेत. काही जण जात्यात आहेत अशा सर्वांवर कारवाई होणार आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.
संजय राऊत यांनी केव्हाही पत्रकार परिषदा घ्याव्यात. आम्हीही काही घाबरत नाही. त्यांच्या आधीच्या पत्रकार परिषदेत काय झालं हे सर्वांना माहीत आहे, असा चिमटाही त्यांनी काढला.
दरम्यान, उद्या भाजपाकडून मुंबईमध्ये मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्या संदर्भात विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाला मुंबई पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे भाजपच्या आमदारांचं शिष्टमंडळ मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्याशी चर्चा करणार आहे. उद्याच्या मोर्चाला मुंबई पोलिसांकडून परवानगी देण्यात यावी अशी मागणी या भाजपच्या शिष्टमंडळाकडून करण्यात येणार आहे. भाजपचे नेते आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली हे शिष्टमंडळ मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांची भेट घेण्याकरता मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयात पोहोचले आहे. या शिष्टमंडळात आमदार मनिषा चौधरी, विद्या ठाकूर, राहुल नार्वेकर, नितेश राणे, योगेश सागर, मिहीर कोटेचा, अतुल भातखळकर, राम कदम, पराग शहा, राजहंस सिंह आदींचा समावेश आहे.
संबंधित बातम्या:
राज्यातील महिला अत्याचाराचा महिला दिनीचं वाचला पाढा! काय म्हणाल्या, भाजप नेत्या चित्रा वाघ…
आयटीच्या रडावर आलेले राहुल कनाल, संजय कदम आणि बजरंग खरमाटे कोण?; शिवसेनेची कोंडी होणार?