नवी दिल्ली | 20 मार्च 2024 : भाजपने लोकसभा निवडणुकीत अनेक विद्यमान खासदार यांना डावलून नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या निर्णयामुळे अनेक खासदार नाराज झाले आहेत. काहींनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे, काहींनी प्रचारापासून दुर राहण्याचा निर्णय घेतला आहे. तर, काहींनी बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी सुरु केलीय. उत्तर प्रदेशमधून देशातील सर्वात जास्त खासदार निवडून दिले जातात. याच उत्तर प्रदेशमध्ये भाजपला सर्वाधिक बंडाळीने ग्रासले आहे. भाजपचा एक बडा नेता आता बंडखोरी करण्याचा तयारीत आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी भाजप लवकरच उत्तर प्रदेशातील उर्वरित जागांसाठी उमेदवारांची नावे जाहीर करू शकते. मात्र, या यादीमधून पिलीभीतचे खासदार वरुण गांधी यांचे तिकीट कापले जाणार हे जवळपास निश्चित झाले आहे. नुकत्याच झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीमध्ये बहुतांश नेत्यांनी वरुण यांचे तिकीट रद्द करण्याची मागणी केली होती. वरुण यांचे सतत पक्षाविरोधात बोलणे हे त्यामागचे कारण असल्याचे सांगण्यात आले.
भाजपने वरुण गांधी यांना पिलीभीत मधून तिकीट नाकारले तर ते अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार आहेत. त्यासाठी त्यांनी नुकतेच त्यांच्या प्रतिनिधीकडून नामनिर्देशनपत्रांचे चार संच मागवले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. त्सेक या निवडणुकीसाठी त्यांनी प्लॅन बी सुद्धा तयार केला आहे असे या सूत्रांनी सांगितले.
2019 मध्ये वरुण गांधी यांनी पिलीभीतमधून लोकसभा निवडणूक लढवली. ही निवडणूक जिंकून ते तिसऱ्यांदा खासदार झाले होते. मात्र, त्यांनी गेल्या काही महिन्यापासून पक्ष विरोधी वक्तव्य करण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे त्यांचे तिकीट डावलून त्यांच्या जागी योगी सरकारमधील मंत्री जितीन प्रसाद यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.
वरुण गांधी यांची एकेकाळी भाजपच्या फायरब्रँड नेत्यांमध्ये गणना होत होती. मात्र, राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधात त्यांनी वक्तव्ये केली होती. देशातील शेतकरी आंदोलन, बेरोजगारी अशा विविध मुद्द्यांवर वरुण गांधी खुलेपणाने आपले मत मांडत आहे. याशिवाय, गेल्या वर्षी यूपी सरकारने अमेठीतील संजय गांधी हॉस्पिटलचा परवाना निलंबित केला होता, तेव्हाही वरुण यांनी सोशल मीडियावर त्याविरोधात लिहिले होते. त्यामुळे उमेदवारी मिळण्याच्या त्यांच्या मार्गात हीच कारणे आडवी आली आहेत.
भाजपकडून उमदेवारी मिळण्याची आशा नसल्याने वरुण गांधी यांनी आपल्या प्रतिनिधीना दिल्ली येथे पाठवले. पिलीभीत येथून अर्ज भरण्यासाठी वरुण गांधी यांचे प्रतिनिधींनी नामनिर्देशनपत्राचे चार संच घेतले आणि ते परतले अशी माहिती सूत्रांनी दिली.
वरुण गांधी यांचे तिकीट कापल्यास ते समाजवादी पक्षाकडून निवडणूक लढवू शकतात, अशीही एक चर्चा होती. अलीकडेच एक बनावट यादीही व्हायरल झाली होती. ज्यामध्ये वरुण गांधी यांची सपाचे उमेदवार म्हणून नाव जाहीर करण्यात आले होते. मात्र, सपाने ही यादी खोटी असल्याचे जाहीर केले होते. सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी वरुण गांधी यांच्याबाबत प्रतिक्रिया देताना आमची संघटना यावर विचार करून निर्णय घेईल असे म्हटले आहे. दरम्यान, वरुण गांधी यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यास सपा आणि काँग्रेस आघाडी आपला उमेदवार देणार नाही अशीही एक शक्यता वर्तविण्यात येत आहे.