नागपूर: आपल्या बिनधास्त आणि मोकळ्याढाकळ्या विधानांमुळे केंद्रीय पर्यावरण मंत्री नितीन गडकरी (nitin gadkari) नेहमीच चर्चेत असतात. आताही ते एका विधानामुळे चर्चेत आले आहे. मी गिरीश भाऊंना नेहमी म्हटलं राजकारण करू नका. मलाही वाटतं राजकारण केव्हा सोडावं आणि केव्हा नाही. राजकारणापेक्षा बऱ्याच गोष्टी जीवनात करण्यासारख्या आहेत. गिरीशभाऊंनी पर्यावरण क्षेत्रात मोठं काम केलं आहे. गिरीश गांधी गुरुजींनी आम्हाला वृक्षारोपण करायला शिकवलं. पर्यावरणाची मला तेव्हापासून गोडी लागली, असं नितीन गडकरी म्हणाले. निमित्त होतं ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश गांधी (girish gandhi) यांच्या अमृतमहोत्सवी वर्षाचं. यावेळी नितीन गडकरी यांनी आजचं राजकारण आणि राजकीय परिस्थिती यावर भाष्य केलं. या कार्यक्रमाला माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे नेते सुशील कुमार शिंदे (sushil kumar shinde) हेही उपस्थित होते.
राजकारण या शब्दाचा अर्थ समजून घ्यावा लागेल. राजकारण हे समाजकारण आहे, विकासकारण आहे की सत्ताकारण आहे. जुन्या काळात महात्मा गांधींपासून ज्यांनी कार्य केलं. ते राजकारण होतं. पण त्यात राष्ट्रकारण, समाजकारण आणि विकासकारण होतं. आता जे पाहतो. ते केवळ शंभर टक्के सत्ताकारण आहे. सामाजिक, आर्थिक परिवर्तनाचं राजकारण हे प्रभावी अंग आहे. म्हणून राजकारणात असताना शिक्षण, साहित्य, कला, पर्यावरण यासाठी काम केलं पाहिजे. त्यासाठी सर्वांनी पुढे आले पाहिजे. या भावनेतून गिरीशभाऊंनी आपलं आयुष्य व्यतित केलं, असे गौरवोद्गगार गडकरी यांनी काढले.
मी 40 वर्ष राजकारणात आहे. माझ्या स्वागताला किंवा मला पोहोचवायला कोणी सरकारी अधिकारी येत नाही आणि कार्यकर्ता येत नाही. एखादा गुच्छ घेऊन आला तर मी त्याला सांगतो. तुला वेळ नाही का? कशा करता आला तू? पुन्हा आला तर लक्षात ठेव. मला हे शिकायला मिळालं ते जॉर्ज फर्नांडिस यांच्याकडून. एखादा माणूस आपल्या जीवनात विचाराने काम करत असताना किती प्रामाणिक, साधा, नम्र आणि किती कठोर असतो हे मला जॉर्ज फर्नांडिस यांच्यात दिसलं. त्यांच्या वागण्या बोलण्यात किती चांगला व्यवहार असतो. त्यांच्या सारखं दुसरं उदाहरण नाही. त्यांच्या सहवासात आल्यावर कळलं किती मोठा माणूस आहे. फर्नांडिस, गिरीशजी हे आपल्या पद्धतीने जगत असतात. त्यांचं जीवन पाहत असताना त्यातून काही तरी करावसं वाटतं, असं ते म्हणाले.
गिरीश गांधी यांनी सर्व क्षेत्रात चांगलं काम केलं आहे. विशेषत: पर्यावरण क्षेत्रात त्यांनी भरीव योगदान दिलं आहे. आताचं राजकारण हे शंभर टक्के सत्ताकारण झालं आहे. पण राजकारणात गुणात्मक परिवर्तनाची एक प्रक्रिया आहे. थोर पुरुषांपासून काही प्रेरणा मिळत असते, असंही ते म्हणाले. सगळ्या विश्वाचं कल्याण व्हावं ही आपली स्वंस्कृती आहे. माझं कल्याण व्हावं असं लिहीलं नाही, असंही त्यांनी सांगितलं.