मुंबई: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी शुक्रवारी राजस्थानी समाजाच्या एका कार्यक्रमात बोलताना मुंबई (Mumbai) आणि महाराष्ट्राबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. महाराष्ट्र आणि मुंबईतून जर गुजराती आणि राजस्थानी लोकांना बाहेर काढले तर मुंबईत पैसा उरणार नाही, सध्या मुंबई देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते, मात्र या समाजाला जर बाहेर काढले तर मुंबईची ही ओळख पुसली जाईल असे राज्यपालांनी म्हटले होते. राज्यपालांच्या या वक्तव्याचा आता राज्यभरातून निषेध करण्यात येत आहे. भाजपा (BJP) नेते आशिष शेलार यांनी देखील राज्यपालांच्या या भूमिकेवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. राज्यपाल महोदयांनी केलेल्या वक्तव्याशी आम्ही अजिबात सहमत नाही. महाराष्ट्र आणि मुंबई मराठी माणसाच्या परिश्रमातून, घामातून आणि हौतात्म्यातून उभी राहीली आहे. आमचा तेजस्वी इतिहास पानोपानी हेच सांगतो. त्याला कुणीही कुठल्याही पदावरून नख लावण्याचा प्रयत्न करु नये! असे शेलार यांनी म्हटले आहे. त्यांनी ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
दरम्यान या वक्तव्यावरून विरोधी पक्षातील नेत्यांकडून देखील राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर जोरदार निशाणा साधण्यात आला आहे. दुसऱ्या राज्यांबद्दल प्रेम असणाऱ्यांनी खुशाल त्या राज्यात जावून रहावे असं राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी म्हटले आहे. तर दुसरीकडे सुप्रिया सुळे देखील राज्यपालांच्या या वक्तव्यावर आक्रमक झाल्या आहेत. राज्यपाल हे संविधानिकपद आहे, त्यामुळे त्या पदाबाबत बोलणे उचित नाही. मात्र राज्यपाल हे सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करत असतात, त्यांच्या या वक्तव्याचा मी निषेध करते असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील मराठी माणसांना डिवचू नका म्हणत राज्यपालांच्या या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.
मा. राज्यपाल महोदयांनी केलेल्या वक्तव्याशी आम्ही अजिबात सहमत नाही.
महाराष्ट्र आणि मुंबई मराठी माणसाच्या परिश्रमातून, घामातून आणि हौतात्म्यातून उभी राहीली आहे. आमचा तेजस्वी इतिहास पानोपानी हेच सांगतो.
त्याला कुणीही कुठल्याही पदावरून नख लावण्याचा प्रयत्न करु नये!— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) July 30, 2022
दरम्यान आता याबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी खुलासा केला आहे. मी काल जे काही बोललो त्यामध्ये मराठी माणसाला दुखावण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता. मी फक्त गुजराती आणि राजस्थानी व्यक्तींच्या व्यवसायातील योगदानाचा उल्लेख केला. महाराष्ट्र हा मराठी मानसाच्या कष्टातूनच निर्माण झाला आहे. त्यामुळेच महाराष्ट्रात अनेक मोठे उद्योगपती दिसून येतात असे राज्यापालांनी आपल्या खुलाशात म्हटले आहे.