बारामती: बारामती (baramati) जिंकण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. त्याचाच एक भाग म्हणून भाजप (bjp) नेत्यांच्या बारामतीत फेऱ्या वाढल्या आहेत. केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) या सुद्धा बारामतीत आल्या होत्या. त्या अजून पाच ते सहा वेळा बारामतीत येणार आहेत. सबकी बारी आती है, किसीका कोई गड नही होता. अनेक गड उद्ध्वस्त होतात. कुणाचे गड राहत नाहीत, असं सूचक विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. राष्ट्रवादीच्या अनेक बाबीना कंटाळून बारामतीतील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भाजपमध्ये येणार आहेत. भविष्यात अनेक मोठे प्रवेश होतील. एक हजार कार्यकर्त्यांचा आज प्रवेश होणार आहे, असंही चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं.
बारामतीत कोण उमेदवार द्यायचा हे केंद्रीय नेतृत्व ठरवेल. आताची निवडणूक जिंकण्यासाठीच लढणार आहोत. कोणत्याही परीक्षेला सामोरे जाताना तयारी करावी लागते. आगामी लोकसभा निवडणुकीत पुन्हा मोदीच येतील. आतापर्यंत बारामतीत जी लढत झाली नाही. त्यापेक्षा जोरदार लढत होईल. देशातले अनेक गड उद्ध्वस्त झालेत. संघटन मजबूत झाल्यानंतर गड उद्ध्वस्त होतात. कुणाचा गड राहणार नाही, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं.
देशातील अनेक गड उद्ध्वस्त होतील. दीड वर्षात सातत्याने दौरे होतील. आम्ही जी तयारी केलीय त्यानुसार आम्ही बारामती जिंकणारच आहोत. चांगल्या कामाला चांगलं म्हटलं जातं. मात्र, आजही बारामतीतील 40-45 टक्के जनता उपेक्षित आहे. संघर्ष निर्माण झाला तर विजय निश्चित होतो. 2024 ला कळेल बारामतीचा विकास झाला की नाही. सुप्रिया सुळे काय बोलल्या माहीत नाही. त्या केंद्रीय अर्थमंत्र्यांना भेटूही शकतात, असं त्यांनी सांगितलं.
आम्ही बारामतीतून लढणारच. निवडून आणण्याची जबाबदारी पक्षाची. आम्ही काटेवाडीत बूथ कमिटीची बैठक घेतलीय. तळागाळातल्या कार्यकर्त्यांना भेटणं हे माझं काम आहे. शरद पवारांनी मोट बांधली किंवा कितीही प्रयत्न केले तरी देशाचे विश्वागुरु मोदीच आहेत. मजबूत भारत करण्याचं मोदींचं व्हिजन आहे. व्हिजन ठेवून काम करणाऱ्यांमागेच जनता राहते. बाकीचे लोक राजकीय व्हिजन ठेवतात, असंही ते म्हणाले.
आमचे बारामतीत 21 कार्यक्रम असतील. त्यातून मतदारसंघाचं विश्लेषण केलं जाईल. राज्यातल्या 16 लोकसभा पहिल्या टप्प्यात पूर्ण केल्या जाणार आहेत. संघटन मजबूत करणे आणि गरीब कल्याण योजना राबवणे हा उद्देश आहे. प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर राज्यभर फिरणार आहे. भाजप-सेना युती राज्यातील सर्व निवडणुका लढवेल. महाराष्ट्रात 45+ लोकसभा आणि 200+ विधानसभा निवडून आणू. जनता धोकेबाजांना बाजूला करुन खऱ्या हिंदुत्वाला साथ देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.