संजय राठोड विषय आता संपवूया…. चित्रा वाघ यांचं मोठं वक्तव्य! नेमकं काय म्हणाल्या?

| Updated on: Nov 10, 2022 | 3:26 PM

चित्रा वाघ यांनीच हा विषय आता संपवूया असं म्हणत या संबंधीचे प्रश्न आता उद्धव ठाकरेंना विचारा, हे वक्तव्य केलंय.

संजय राठोड विषय आता संपवूया.... चित्रा वाघ यांचं मोठं वक्तव्य! नेमकं काय म्हणाल्या?
Image Credit source: social media
Follow us on

सुरेन्द्रकुमार आकोडे, अमरावतीः संजय राठोड (Sanjay Rathod) हा विषय आता संपवूया, असं मोठं वक्तव्य भाजपा महिला आघाडीच्या  प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी केलंय. अमरावतीत माध्यमांशी बोलताना त्यांनी सर्वांनाच धक्का देणारं हे वक्तव्य केलं. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारच्या काळात शिवसेना आमदार संजय राठोड यांच्यावर आक्रमकपणे दोषारोप करणाऱ्या चित्रा वाघ यांनी अचानक युटर्न घेतल्याने आश्चर्य व्यक्त केलं जातंय. पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्येसाठी यवतमाळचे आमदार संजय राठोड दोषी असल्याचा ठपका भाजप तसेच महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी ठेवला होता. मात्र आता शिंदे आणि भाजपचं सरकार आल्यावर चित्रा वाघ यांनी ही भूमिका घेतली आहे.

काय नेमकं म्हणाल्या?

अमरावतीत बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या, ‘ संजय राठोड प्रकरण आता संपवूया. त्याशिवाय महाराष्ट्रात खूप विषय प्रश्न आहेत. संजय राठोड यांच्या विरोधात लढा सुरूच राहील पण तो न्यायालयात. तेथे माझा लढा सुरू राहील. संजय राठोड यांना महाविकास आघाडी सरकारनेच क्लीन चिट दिली आहे, त्यामुळे काही प्रश्न तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनाही विचारा असा सल्ला चित्रा वाघ यांनी दिला आहे.

नेमकं काय प्रकरण आहे?

  • 7 फेब्रुवारी 2021 रोजी पूजा चव्हाण या तरुणीने पुण्यातल्या वानवडी परिसरात आत्महत्या केली.
  •  पूजा चव्हाण ही मूळची बीडची असून ती टिकटॉक स्टार म्हणून प्रसिद्ध होती. आत्महत्येपूर्वी काही दिवसांपासून ती पुण्यात स्थायिक होती.
  •  पूजा चव्हाणच्या आत्महत्ये प्रकरणी यवतमाळचे आमदार संजय चव्हाण दोषी असल्याचा ठपका देवेंद्र फडणवीस आणि भाजप महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी ठेवला होता.
  •  पूजा चव्हाण आणि संजय राठोड यांच्या कथित फोन संभाषणाच्या ऑडिओ क्लिपदेखील भाजपने सादर केल्या होत्या.
  •  त्यानंतर महाविकास आघाडीत वनमंत्री असलेले संजय राठोड यांना मंत्रिपद गमवावे लागले होते.
  •  पूजाच्या आई-वडिलांनी मात्र जबाबात कोणतीही तक्रार दिली नव्हती.
  •  महाविकास आघाडी सरकारमध्येच पुणे पोलीस स्टेशनने काही काळानंतर संजय राठोड यांना क्लिन चीट दिली.
  •  त्यानंतर संजय राठोड यांना पुन्हा मंत्रिपद दिले जाण्याची मागणी जोर धरू लागली.
  •  जून-जुलै 2022 मध्ये महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि एकनाथ शिंदे-भाजप सरकार आलं. एकनाथ शिंदे गटात संजय राठोड शामिल झाले.
  •  यानंतर चित्रा वाघ यांची भूमिका नरमते का, असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला. मात्र त्यानंतरही संजय राठोड यांच्याविरोधातील लढा सुरूच राहिल असं म्हटलं होतं.
  •  शिंदे-भाजप सरकारमध्ये संजय राठोड यांना मंत्रिपद मिळाल्यानेही सर्वत्र टीकेची झोड उठली होती.
  •  मात्र आता तर चित्रा वाघ यांनीच हा विषय आता संपवूया असं म्हणत या संबंधीचे प्रश्न आता उद्धव ठाकरेंना विचारा, हे वक्तव्य केलंय. चित्रा वाघ यांचा हा यू टर्न आश्चर्य व्यक्त करणारा ठरतोय.