मुंबई : “आम्हाला सरकार स्थापनेची कोणतीही घाई नाही. हे सरकार त्यांच्या कृतीने खाली कोसळेल. ते कोसळेल तेव्हा आम्ही बघू,” अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या भेटीनंतर दिली. (Devendra Fadnavis clarification after meeting with Sanjay Raut)
संजय राऊत यांनी फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर राज्यातील राजकारणात खळबळ उडाली होती. सुरुवातीला दोन्ही पक्षांनी अशी कोणतीही भेट झाली नसल्याचं म्हटलं होतं. मात्र, नंतर स्वतः संजय राऊत यांनीच या भेटीची कबुली दिली होती. त्यानतंर फडणवीसांनी ANI या वृत्तसंस्थेशी बोलताना याबाबतची प्रतिक्रिया दिली.
“आम्हाला सरकारमध्ये यायची कोणतीही घाई नाही. अशा सरकारसोबत मला काहीही तोडगा काढायचा नाही. त्यामुळे मी खूप स्पष्ट शब्दात सांगू इच्छितो की, सध्या परिस्थिती अशी आहे की आमच्या भेटीचे अनेक वेगवेगळे अर्थ काढण्यात आलेत. त्यामुळे हे टायमिंग चुकीचं आहे. मला लोकांचा राग आहे हे माहिती होतं पण त्यांचा इतका राग आहे हे माहिती नव्हतं. पण याचं कोणतंही राजकीय हेतू नाही,” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“संजय राऊत यांनी घोषित केलं होतं की, मी फडणवीसांची मुलाखत घेणार आहे. त्यासंदर्भात त्यांचा फोन आल्यानंतर मी त्यांना मुलाखत देईन असे सांगितले होते. मात्र ही मुलाखत अनएडिटेड असली पाहिजे. त्या ठिकाणी माझाही कॅमेरा असेल, अशा काही अटी मी सांगितल्या होत्या. त्यानंतर त्यांनी आपण भेटून बोलू असं ठरलं होतं,” असे फडणवीसांनी यावेळी सांगितले.
“त्या मुलाखतीबाबत बोलण्यासाठी ही भेट होती. यावेळी कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही. शिवसेनेसोबत सत्तास्थापनेबाबत भाजपची कोणतीही चर्चा नाही. कोणतं कारणंही नाही. सध्या सरकारचं ज्या पद्धतीने काम सुरु आहे त्यामुळे लोकांमध्ये खूप आक्रोश आहे. विरोध पक्ष आम्ही सरकारला जे चुकतंय यावरुन धारेवर धरतोय. मला विश्वास आहे की आपल्या कृतीने खाली कोसळेल. ते कोसळेल तेव्हा आम्ही बघू. आम्हाला सरकार स्थापनेची कोणतीही घाई नाही,” असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
दरम्यान, काल (26 सप्टेंबर) शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजप नेते, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गुप्त भेट झाली होती. मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये ही भेट झाली. दुपारी दीड ते साडेतीन असे तब्बल 2 तास ही भेट झाली. या भेटीची एक्स्क्लुझिव्ह दृश्य टीव्ही 9 मराठीच्या हाती लागले होते. ही भेट झाल्यानंतर सुरुवातीला संजय राऊत यांनी या भेटीचा इन्कार केला. मात्र देवेंद्र फडणवीसांची पांढऱ्या रंगाची गाडी या हॉटेलमधून स्पष्टपणे बाहेर पडताना दिसली. त्यामुळे या भेटीचं बिंग फुटलं. (Devendra Fadnavis clarification after meeting with Sanjay Raut)
संबंधित बातम्या :
EXCLUSIVE : संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांची गुप्त भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ?
फडणवीसांना भेटणं अपराध आहे का?, राऊतांचा सवाल
अशा भेटी होतच असतात, चंद्रकांत पाटलांचं सूचक विधान
फडणवीसांसोबत बैठक गुप्त नव्हती, आम्ही वैयक्तिक शत्रू नाही : संजय राऊत