मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्यांचा मुलगा नील सोमय्यांची पीएचडीची डिग्री सध्या चर्चेत आली आहे. सोशल मीडियात व्हायरल दाव्यांनुसार सोमय्यांचे पुत्र नील सोमय्यांनी अवघ्या 14 महिन्यात पीएचडी मिळवली आणि. या डिग्रीमुळे सोमय्या आणि त्यांच्या मुलावर जोरदार टीका होत आहे. यावर किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया देताना हा दावा खोडून काढण्याचा प्रयत्न केला आहे.
फाईल्स आणि कागदपत्रं दाखवून जवळपास दीड डझन नेत्यांमागे चौकशीचा ससेमिरा लावणाऱ्या किरीट सोमय्यांच्या मुलाच्या पीएचडीची पदवी वादात आली आहे.
सोशल मीडियात व्हायरल झालेल्या पदवीनुसार किरीट सोमय्यांचे पुत्र नील सोमय्यांनी फक्त 14 महिन्यातच ही पीएचडीची डिग्री मिळवली आहे.
व्हायरल कागदपत्रांनुसार किरीट सोमय्यांचे पुत्र नील सोमय्यांनी ऑगस्ट महिन्यात पीएचडीसाठीचा प्रबंध सादर केला. प्रबंध सादर केल्यानंतरच्या अवघ्या दीड महिन्यातच नील सोमय्यांना तोंडी परीक्षेसाठी बोलावलं गेलं.
विशेष म्हणजे या तोंडी परीक्षेनंतरच्या दुसऱ्याच दिवशी मुंबई विद्यापीठाकडून नील सोमय्यांना पदवी प्रदान केली गेली.
पीएचडी पदवी प्रदान सोहळ्याचे काही फोटो किरीट सोमय्यांचे पुत्र नील सोमय्यांनी त्यांच्या सोशल अकाऊंट्सवर शेअर केले आहेत. या फोटोंमुळेच सोमय्यांच्या पीएचडीची डिग्री बाबात प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
ज्या वेगानं पीएचडी झाली आणि ज्या वेगानं मुंबई विद्यापीठाकडून सोमय्यांच्या मुलाला पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली त्या वेगावरुन नेटकऱ्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.
यासंदर्भात दोन्ही बाजूनं दोन कागदपत्रं समोर आली आहेत. एक पीएचडीच्या पूर्वपरीक्षेचा कागद आहे. 17 सप्टेंबर 2016 ला सोमय्यांचे पुत्र नील सोमय्यांनी परीक्षा दिल्याचा दावा या द्वारे करण्यात आला आहे.
तर, दुसरा कागद हा नील सोमय्यांच्या पीएचडीच्या पूर्ण कार्यक्रमाचा आहे.ज्यात पीएचडी रेजिस्ट्रेशनची तारीख ही जून 2021 ची आहे.
यासंदर्भात मुंबई विद्यापीठाकडे तक्रारही करण्यात आली. मात्र, सारं काही नियमात झाल्याचा दावा केला जातोय.
विरोधकांनीही सोमय्यांच्या मुलाच्या पीएचडीच्या वेगावर आश्चर्य व्यक्त केले आहे. तर, स्वतः किरीट सोमय्यांनी 14 महिन्यांचा आरोप खोडत पीएचडीसाठी 72 महिने लागल्याचा दावा केला आहे.