परळी (बीड) : भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त बीडमधील गोपीनाथगडावर मुंडे समर्थकांचा मेळा जमणार आहे. गोपीनाथ मुंडेंच्या कन्या आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी यानिमित्त ‘स्वाभिमान दिना’चं आयोजन (Pankaja Munde at Gopinath Gad) केलं आहे. मुंडे समर्थकांना संबोधित करताना पंकजा मुंडे नेमकी कोणती घोषणा करणार, आपल्या मनातील नाराजी आणि खदखद व्यक्त करणार का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं येत्या काही तासांत मिळणार आहेत. पंकजा मुंडे दुपारी एक वाजता संबोधित करतील.
पंकजा मुंडेंसह त्यांच्या भगिनी आणि भाजप खासदार प्रीतम मुंडे, भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विनोद तावडे, प्रकाश मेहता, राज पुरोहित, सुरेश धस, रासप अध्यक्ष आणि पंकजा मुंडे यांचे मानलेले भाऊ महादेव जानकरही गोपीनाथ गडावर हजेरी लावणार आहेत. यापैकी खडसे, तावडे, मेहता यासारखे नेते विधानसभा निवडणुकीत तिकीट कापलं गेल्यामुळे पक्षावर नाराज असल्याचं बोललं जातं. त्यामुळे नाराजांच्या मेळ्यात वेगळा मार्ग निघणार, की शक्तिप्रदर्शनात भाजपवर दबाव टाकला जाणार, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
पंकजा मुंडे यांचा आजचा कार्यक्रम
10.00 वाजता – परळीतील निवासस्थानी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी
10.15 वाजता – एकनाथ खडसे, प्रकाश मेहता, चंद्रशेखर बावनकुळेंसह इतर नेत्यांच्या भेटी
10.30 वाजता – गोपीनाथ गडाच्या दिशेने रवाना होणार
11.00 वाजता – गोपीनाथ गडावर दाखल होणार
11.05 वाजता – गोपीनाथ गडावरील छोट्या मंदिरात दर्शन
11.15 वाजता – दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीस्थळाचं दर्शन
11.30 वाजता – गोपीनाथ गडावरील व्यासपीठावर दाखल होणार
1.00 वाजता – कार्यकर्त्यांना संबोधित करणार
राजकीय भूकंप करणार का? पंकजा मुंडे म्हणतात- हो, पण…..
हा कार्यक्रम राजकीय नसून गोपीनाथ मुंडेंवर प्रेम करणारे कार्यकर्ते तिथे येणार आहेत, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या. या मेळाव्यातून पोस्टर्सवर आधी कुठेही भाजपचा उल्लेख किंवा कमळ चिन्ह नव्हतं, मेळाव्याच्या ठिकाणी भाजपचे झेंडेही नव्हते. परंतु दुपारनंतर जुने पोस्टर्स हटवून भाजपचं चित्र असलेले नवे बॅनर झळकवण्यात आले.
मी संघर्षकन्या
‘मी लोकांमुळे राजकारणात आले. त्यामुळे लोकांना काय हवं आहे, हे लक्षात घेऊनच निर्णय घ्यायचा आहे. मी पहिल्यांदाच निवडणुकीत पराभूत झाले. त्यामुळे ही परिस्थिती वेगळी आहे. म्हणूनच मी आत्मपरीक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. मी नाराज नाही’ असं पंकजा मुंडे यांनी ‘टीव्ही9 मराठी’ला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत म्हटलं होतं. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्या घरी येऊन तीन तास चर्चा केली, अशी माहितीही त्यांनी दिली.
“मी वैयक्तिक कुणावरही नाराज नाही. पण मी कार्यपद्धतींवरील दोषांवर बोलते. माझी वाढ तशीच झाली आहे. पाच वर्षात खूप गोष्टी बदलल्या आहेत. त्याविषयी मी कार्यकर्त्यांशी बोलेन,” असेही पंकजा मुंडे (Pankaja Munde at Gopinath Gad) यांनी स्पष्ट केलं.