मंत्रिमंडळ विस्ताराच्या तारखा हवेत देऊ नये, शिंदेंच्या आमदाराला भाजप नेत्यानेच सुनावलं….

| Updated on: Jan 07, 2023 | 3:01 PM

मंत्रिमंडळ विस्ताराच्या तारखा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघे ठरवून घोषित करतील, आमदारांनी यावर बोलू नये, अशा शब्दात शिरसाट यांची कानउघडणी करण्यात आली.

मंत्रिमंडळ विस्ताराच्या तारखा हवेत देऊ नये, शिंदेंच्या आमदाराला भाजप नेत्यानेच सुनावलं....
Image Credit source: social media
Follow us on

भूषण पाटील, कोल्हापूरः आगामी मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion) कधी होणार याबद्दल मोठं भाष्य शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी केलंय. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी याबाबत चर्चा झाली असून लवकरच यातील तांत्रिक अडचणी सोडवल्या जाणार असल्याचं सूतोवाच शिरसाट यांनी केलंय. विस्ताराची तारीखही शिरसाट यांनी घोषित केली. यावरून भाजप नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी त्यांची चांगलीच कानउघडणी केली.

मंत्रिमंडळ विस्ताराच्या तारखा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघे ठरवून घोषित करतील. आमदारांच्या पातळीवर हा निर्णय होत नसतो. कुणीही अशा हवेत तारखा देऊ नयेत, असं वक्तव्य प्रवीण दरेकर यांनी केलंय.

संजय शिरसाट यांचा दावा काय?

शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट म्हणाले, राज्यात आथा मंत्रिमंडळ विस्तार करावाच लागणार आहे. येत्या 20 ते 22 जानेवारीच्या दरम्यान मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. 15 जानेवारीपर्यंत तांत्रिक अडचणी दूर होतील….

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत येऊन सहा महिने उलटत आहेत. या सहा महिन्यात फक्त एकदाच मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे. लवकरच दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचं म्हटलं जातंय.

आपल्याला चांगलं खातं मिळेल, या आशेकडे अनेक आमदार प्रतीक्षेत आहेत. खातेवाटपाकडे डोळे लावून बसले आहेत. मात्र या प्रक्रियेत काही तांत्रिक अडचणी असल्याचं कारण दिलं जातंय. आता संजय शिरसाट यांच्या वक्तव्याने पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलंय.

संजय राऊतांवर निशाणा

कोल्हापुरात बोलताना भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. संजय राऊत यांच्या हातात आता काहीच राहिलेलं नाही. शिवसेनेचा कारभार आधीच आदित्य ठाकरेंकडे गेला आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात एकनाथ शिंदेदेखील केबिनच्या बाहेर असत, त्यांच्या खात्याच्या बैठका आदित्य ठाकरे घेत असत, असा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला.

उद्धव ठाकरे गटाकडे आता शिवसेना किती शिल्लक राहिली आहे? संजय राऊत आदित्य ठाकरे यांना ओसाड गावचा पाटील बनवायला निघालेत, असा टोमणा प्रवीण दरेकर यांनी लगावला.