मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्या मुलाखतीवर भाजप (bjp) नेते आणि आमदार प्रवीण दरेकर (pravin darekar) यांनी जोरदार टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांना वैफल्य आलं आहे. त्यामुळे ते जुन्या गोष्टींना उजाळा देत आहेत. भाजपला कधीच सत्तेची लालसा नव्हती. आम्हाला सत्तेची हाव असती तर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद दिलं नसतं, असं सांगतानाच भाजपचा जीव सर्व सामान्यांचे प्रश्न सोडवण्यात आहे. मुंबई महापालिका कुणाची जागीर नाहीये. भाजपचा जीव मुंबई महापालिकेत आहे. कारण मुंबईकरांना सुविधा मिळत नाही. 25 वर्ष तुमचा जीव महापालिकेत होता. आता तुमचा जीव जरा बाजूला ठेवा. बघा महापालिकेवर भाजपचाच झेंडा फडकेल. महापालिकेत आमचीच सत्ता येईल, असं प्रवीण दरेकर यांनी सांगितलं. ते मीडियाशी संवाद साधत होते. उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीतील अनेक मुद्दे त्यांनी खोडून काढले.
भाजपला दुसऱ्यांना मुख्यमंत्रीपद देण्याची वेळ आली आहे. विधान परिषदेचा विरोधी पक्षनेताही बाहेरच्या व्यक्तिला दिलं. त्यांच्याकडे बाहेरच्या लोकांना पदे दिलं जात आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती. या टीकेचाही दरेकर यांनी समाचार घेतला. दुसऱ्या कडे बोट दाखवताना चार बोट आपल्या कडे असतात. उदय सामंत, यड्रावकर कुठून आले? प्रियांका चतुर्वेदी कोण आहे? आधी स्वतःकडे बघावं आणि मग बोलावं, असं दरेकर म्हणाले.
शिवसेनेचं आता चिटूरफिटूर आंदोलन सुरू आहे. आंदोलन करायलाही यांच्याकडे माणसं राहिली नाहीत, असा चिमटा त्यांनी काढला. खोट्या कारणासाठी का होईना त्यांनी वेळ मागून घेतला आहे. आजच मरण उद्या वर टाळलं आहे, असा टोला त्यांनी राऊत यांना ईडीच्या चौकशीवरून लगावला.
खोडा घालण्याचा काम आता करू नये. मुख्यमंत्री -उपमुख्यमंत्र्यांना काम करू द्या, असं आवाहन त्यांनी उद्धव ठाकरे यांना केलं. तसेच विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरही त्यांनी टीका केली. अजितदादांना फार लवकर जाग आली. वराती मागून घोडे नाचवण्याचा प्रयत्न आहे. आम्ही जेव्हा विरोधीपक्ष नेते होतो तेव्हा लगेच पूर परिस्थितीच्या भागात जात होतो. पण यांना आपला मतदारसंघ पहिला दिसतो. यांनी 20 वर्ष फक्त आपला मतदारसंघ पाहिला विदर्भ, कोकण आणि मराठावाड्याकडे पाहिले नाही, अशी टीका त्यांनी केली.