संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ होणार? राहुल कुल नेमकं काय म्हणाले?

| Updated on: Apr 27, 2023 | 5:13 PM

खासदार संजय राऊत यांनी आमदार राहुल कुल यांच्यावर गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. विशेष म्हणजे राऊत यांनी राहुल कुल यांच्याविरोधात दौंडमध्ये जाहीर सभाही घेतली. या सभेत त्यांनी राहुल कुल यांच्यावर सडकून टीका केली. या टीकेवर आता राहुल कुल यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ होणार? राहुल कुल नेमकं काय म्हणाले?
Image Credit source: tv9
Follow us on

पुणे : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे बुधवारी (26 एप्रिल) पुण्याच्या दौऱ्यावर होते. पुण्यात त्यांची सभाही झाली. या दौऱ्यादरम्यान त्यांनी आमदार राहुल कूल यांच्यावर भीमा पाटस साखर कारखान्यात 500 कोटींचा घोटाळा केला, असा गंभीर आरोप केला. संजय राऊतांची दौंडमध्ये काल सभाही पार पडली. यावेळी त्यांनी राहुल कुल यांच्याविरोधात आपण ईडीकडे तक्रार करु, असंही म्हटलं. तसेच भीमा पाटस साखर कारखान्यात प्रवेश न दिल्यामुळे आपण राज्यसभेत त्यांच्यावर हक्कभंग आणू, असं म्हटलं. राऊतांनी काल दिवसभरात अनेकदा राहुल कुल यांच्यावर निशाणा साधला. त्यावर आता कुल यांनी उत्तर दिलं आहे. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी एका प्रकरणाची आठवण काढून दिलीय ज्यामुळे खासदार संजय राऊत यांच्या अडचणी वाढू शकतात.

संजय राऊत यांच्यावर काही दिवसांपूर्वी विधी मंडळाच्या सभागृहात हक्कभंगाचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यांच्याविरोधातील हक्कभंगाच्या प्रस्तावावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलाच गदारोळ झाला. या प्रकरणी हक्कभंग समिती चौकशी करत आहे. याच प्रकरणाची आठवण करुन देत राहुल कुल यांनी संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिलं.

राहुल कुल यांचं सूचक विधान?

“माझ्याकडे हक्कभंग समिचीचं अध्यक्षपद आल्यानंतर संजय राऊत यांनी आरोप सुरू केलेत आहेत. हक्कभंग समितीची पहिली बैठक झाली आहे. दुसरी बैठक अध्यक्षांच्या कार्यवाहीनुसार होईल”, असं राहुल कुल म्हणाले. राहुल कुल यांनी या प्रतिक्रियेतून संजय राऊत यांच्याबद्दल सूचक वक्तव्य केलं आहे. त्यामुळे आगामी काळात हक्कभंग समितीकडून संजय राऊत यांना दोषी ठरवलं जातं का? ते पाहणं महत्त्वाचं ठरेल. हक्कभंग समितीने राऊतांना दोषी ठरवलं तर त्यांच्या अडचणी वाढू शकतात.

“संजय राऊत म्हणतात की मी कोणाला घाबरत नाही. तसं मीही अनेकांना घाबरत नाही. मात्र संजय राऊत जर अशा पद्धतीने दबाव आणत असतील तर चुकीचं आहे. संजय राऊतांनी खूप उशीर केलाय. त्यांनी चौकशीची मागची केली आहे तर मी कोणत्याही चौकशीला सामोरं जायला तयार आहे. 36 कोटी रुपयांचा हिशोब हा आम्ही 30 दिवसांतच दिला आहे”, असं राहुल कुल म्हणाले.

हे सुद्धा वाचा

“सहकारी साखर कारखान्यात मनी लॉन्ड्रिंग झालेलं नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इथली सगळी परिस्थिती माहिती आहे. आम्ही कोणत्याही चौकशीला सामोरं जायला तयार आहोत. शक्तीप्रदर्शन काय असतं हे आम्ही वेळ आलं की दाखवून देऊ”, अशी प्रतिक्रिया राहुल कुल यांनी दिली.