मुंबईः महाविकास आघाडीचं (Mahavikas aghadi) सरकार असताना ममता बॅनर्जी महाराष्ट्रात आल्या होत्या. याच आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) त्यांची गळाभेट घेऊन स्वागत केलं. मग ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) तेव्हा काय गोट्या खेळण्यासाठी आल्या होत्या का? असा सवाल भाजप नेते राम कदम यांनी केलाय. राम कदम म्हणाले, महाराष्ट्रातले उद्योग निघून जायला आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाहीत. राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची सत्ता आहे.
ममता बॅनर्जी मुंबईत गोट्या खेळायला आल्या होत्या का? पश्चिम बंगालमध्ये उद्योग धंद्यांत गुंतवणूक करण्याचं आवाहन कऱण्यासाठीच त्या आल्या होत्या…
मुंबई, महाराष्ट्रातला कोणताही उद्योग येथून जाणार नाही. कारण महाराष्ट्रात खमकं नेतृत्व आहे. प्रत्येक मुख्यमंत्री वेगवेगळ्या राज्यात जाऊन उद्योगधंद्यांसाठी प्रयत्न करत असतो. तसा तो प्रयत्न योगी करत असतील तर थेट आरोप करणं चुकीचं असल्याचं राम कदम म्हणाले.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्य नाथ यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरून वातावरण चांगलंच चिघळलं आहे. आज सामना वृत्तपत्रातून यावर तीव्र भाष्य करण्यात आलंय. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाशिकमध्ये शिवसेनेतील पालापाचोळा गोळा करण्यात मग्न होते, तेव्हा योगी महाराजांनी मुंबईतून ५ लाख कोटी नेल्याचा दावा सामनातून करण्यात आलाय.
महाराष्ट्राच्या हाती आवळा देऊन कोहळा काढण्याचा हा प्रकार आहे. पण सत्तेवर दुर्बळ, लाचार, बधीर सरकार असल्यास दुसरे काय व्हायचे? मुख्यमंत्र्यांना फक्त चाळीस आमादारांच्या खोक्यांची काळजी आहे, असा आरोप सामनातून करण्यात आलाय.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजय आशर यांच्या अध्यक्षतेखाली औद्योगिक विकासासाठी मैत्री नावाची संस्था स्थापन केली. मात्र या मैत्रीने गुंतवणूक कशी बाहेर जाऊ दिली, असा सवालही सामनातून करण्यात आलाय.