लातूर : ग्रामीणमधून सध्या जिल्हा परिषद सदस्य असलेले धीरज देशमुख निवडणूक रिंगणात उतरले आहेत. तर दुसरीकडे या मतदारसंघातील भाजपचे संभाव्य उमेदवार रमेश कराड (Latur Ramesh Karad) यांची फसगत झाली आहे. गेल्या वेळी भाजपकडे असलेला हा मतदारसंघ आता शिवसेनेकडे गेला आहे. विशेष म्हणजे लातूर ग्रामीणमध्ये (Latur Ramesh Karad) शिवसेनेचं अस्तित्व नगण्य आहे. तरीही हा मतदारसंघ शिवसेनेला सोडण्यात आला आहे.
देशमुख कुटुंबात दोघांना उमेदवारी
दिवंगत नेते विलासराव देशमुख यांच्या दोन मुलांना यावेळी काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली आहे. धाकटे चिरंजीव धीरज देशमुख यांच्यासाठी लातूर ग्रामीणचे विद्यमान काँग्रेस आमदार त्र्यंबक भिसे यांचंही तिकीट कापण्यात आलंय. शिवसेना आणि भाजप युतीमध्ये लातूर ग्रामीण मतदारसंघ शिवसेनेला सोडण्यात आलाय. शिवसेनेकडून इथे देशमुख कुटुंबीयांच्या जवळचेच सचिन देशमुख यांना उमेदवारी दिली आहे.
रमेश कराड यांची पुन्हा निराशा
ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचे मानलेले भाऊ रमेश कराड हे गेल्या अनेक वर्षांपासून नशिब आजमावत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधानपरिषद निवडणुकीत त्यांनी बंडखोरीही केली होती. पण ऐनवेळी माघार घेत त्यांनी भाजपचे उमेदवार सुरेश धस यांना मदत केली आणि त्यांचा विजयही झाला. यावेळी लातूर ग्रामीणची उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा असलेले रमेश कराड यांची पुन्हा एकदा निराशा झाली आहे. कारण, हा मतदारसंघ ऐनवेळी शिवसेनेला सुटलाय.