बीड : “साखर संघाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना घेऊन चर्चा करावी. शरद पवार जाणते आहेत. जोपर्यंत बैठक होणार नाही, तोपर्यंत संप सुरुच राहणार, असा इशारा भाजपा आमदार सुरेश धस यांनी दिला. जर बैठकीत मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर तीव्र आंदोलन करु,” असेही सुरेश धस म्हणाले. (Suresh Dhas On Sugarcane workers strike)
“साखर संघात आमची ताकद बघू नका. जोपर्यंत बैठक होणार नाही तोपर्यंत ऊसतोड कामगाराने कामावर जायचं नाही. परवा बैठक आहे त्यानंतर निर्णय घेऊ. साखर संघाच्या बैठकीत शरद पवार असतील तरच आम्ही चर्चा करु, असेही सुरेश धस यांनी सांगितले.
सुरेश धस यांच्या आष्टी येथील निवासस्थानी ऊसतोड मजूर आणि मुकादमांचा मेळावा सुरु आहे. या मेळाव्यात भाषणादरम्यान धस यांनी सरकारवर टीका केली. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांना वंदन करून त्यांनी भाषणाला सुरुवात केली. संघटनेत राजकारण आणू नये, ही शिकवण मुंडे साहेबांची आहे,” असेही ते यावेळी म्हणाले.
“हा ऊसतोड कामगारांचा संप नाही. तर शोषित वंचितांचा हा लढा आहे. आता कडेलोट होणार आहे. या दौऱ्यात मला माझ्या पक्षाने पाठिंबा दिला आहे. तसं शिवसेना आणि काँग्रेसनेही द्यावा,” असेही सुरेश धस यांनी सांगितले.
“संघटनेला विचारल्याशिवाय मुंडेसाहेब कधीच काही निर्णय घेत नव्हते. ज्यांना बैलगाडी माहीत नाही, अशांनी ऊसतोड मजुरांचं नेतृत्व करणे हे जमणार नाही,” असा टोलाही धस यांनी पंकजा मुंडेंना लगावला.
“ही वेळ भाषणाची नाही, आमच्या रोजी रोटीचा प्रश्न आहे. साखर संघांची बैठक आहे. मात्र आम्हाला निमंत्रण नाही. जर निमंत्रण दिले तरच जाऊ. साखर संघाने पवार साहेबांना घेऊन चर्चा करावी. पवार साहेब जाणते आहेत,” असेही सुरेश धस म्हणाले.
“ऊसतोड मजूर, मुकादम यांच्याबाबत कायदा झाला पाहिजे. सर्वांची जात एकच आहे. आमच्यात भांडण लावू नका. हा 13 लाख ऊसतोड मजुरांचा प्रश्न आहे. भाववाढ घेतल्याशिवाय संप मागे घेणार नाही,” असा इशारा सुरेश धस यांनी दिला.
“आम्हाला शेतकरी अडवायचा नाही, आमच्या पोटापाण्याचं बघा. पश्चिम महाराष्ट्रातील कारखानदारांनी इकडे येऊ नका.
इथे टायरच्या हवा सोडतील. कोणी ट्रॅक्टर जाळेल आणि आमचं नाव येईल. त्यामुळे धंदा करण्यापेक्षा कायदा करा. भाववाढ झाल्याशिवाय महाराष्ट्रातील कोणीही मजूर हलणार नाही,” असेही सुरेश धस यावेळी म्हणाले. (Suresh Dhas On Sugarcane workers strike)
संबंधित बातम्या :
पंकजा मुंडे संपल्या असं वाटणाऱ्यांनी ही जनसंपत्ती पाहावी; पंकजा मुंडेंचा विरोधकांना टोला
शरद पवार यांनी पक्षात घेतलं नसतं, तर मी राजकारणातून बाद झालो असतो – एकनाथ खडसे