मुंबई: आगामी वर्षात होऊ घातलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता शिवसेनेत इनकमिंगला सुरुवात झाली आहे. माजी आमदार आणि भाजपचे विद्यमान नेते सुरेश गंभीर हे लवकरच शिवसेनेत घरवापसी करणार असल्याचे समजते. त्यामुळे आता मुंबईत पालिका निवडणुकीच्यादृष्टीने फोडाफोडीच्या राजकारणाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. (BJP leader Suresh Gambhir may join Shivsena soon)
सुरेश गंभीर हे शिवसेनेचे माजी आमदार होते. 2016 मध्ये त्यांनी शिवबंधन सोडून भाजपचे कमळ हातात घेतले होते. मात्र, बऱ्याच काळापासून ते भाजपवर नाराज होते. परिणामी ते भाजपमध्ये कधीच फारसे रमले नाहीत. सुरेश गंभीर यांनी नुकतीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यामुळे सुरेश गंभीर आणि त्यांच्या दोन्ही कन्यांची शिवसेनेत घरवापसी होणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
सुरेश गंभीर यांनी उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर यावर स्पष्टपणे बोलण्यास नकार दिला. परंतु, मी मनाने अजूनही शिवसैनिक असल्याचे सूचक वक्तव्य त्यांनी केले. सुरेश गंभीर यांनी 2016 साली शीतल आणि शामल या आपल्या दोन मुलींसह भाजपमध्ये प्रवेश केला होता. यापैकी शीतल गंभीर या सध्या वॉर्ड क्रमांक 182 मधील भाजपच्या नगरसेविका आहेत. तर भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवलेल्या शामल यांचा पराभव झाला होता. आता या तिघांच्या घरवापसीमुळे राजकीय वतुर्ळात काय पडसाद, उमटणार हे पाहावे लागेल.
सुरेश गंभीर हे शिवसेनेच्या जुन्या फळीतील नेत्यांपैकी एक आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात 1978 साली ते माहीम परिसरातून पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले. नंतरच्या काळात सुरेश गंभीर माहीम मतदासंघातून चारवेळा विधानसभेवर निवडून गेले होते.
भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर पातळी सोडून केलेली टीका आणि त्यानंतर त्यांना झालेली अटक यामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये संघर्षाची मोठी ठिणगी पडली आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत शिवसेना आणि भाजपमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळेल. मुंबई महानगरपालिकेतील शिवसेनेचा भगवा खाली उतरवण्यासाठी भाजपने वर्षभरापूर्वीच मोर्चेबांधणीला सुरुवात केली होती. त्यासाठी भाजपचे आक्रमक नेते अतुल भातखळकर यांची प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली होती.
तर काही दिवसांपूर्वीच नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रिपद देऊन भाजपने त्यांना शिवसेनेविरोधात सक्रिय केले आहे. नारायण राणे यांच्या नुकत्याच पार पडलेल्या जनआशीर्वाद यात्रेमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. यावेळी शिवसेना आणि भाजप नेत्यांमध्ये झालेला संघर्ष आगामी काळात आणखी तीव्र होणार, हे निश्चित आहे.
संबंधित बातम्या:
भाजपचा शिवसेना भवनावर फटकार मोर्चा, शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांची प्रचंड हाणामारी
(BJP leader Suresh Gambhir may join Shivsena soon)