अहमदनगर : अहमदनगरमधून लोकसभेसाठी भाजपच्या सुजय विखेंविरुद्ध संग्राम जगताप यांचं नाव निश्चित करण्यात आलंय. संग्राम जगताप हे राष्ट्रवादीचे नगर शहरमधून सध्याचे आमदार आहेत. शिवाय त्यांचे वडील अरुण जगताप हे राष्ट्रवादीचे विधानपरिषदेचे आमदार आहेत. संग्राम जगताप यांचे सासरे आणि नगरमधील किंगमेकर राजकारणी म्हणून ओळख असलेले शिवाजी कर्डिले हे भाजपचे आमदार आहेत. कर्डिलेंचे व्याही आमदार अरुण जगताप यांनी मुलाला उमेदवारी जाहीर होताच गौप्यस्फोट केलाय. भाजपचेही काही नेते माझ्या संपर्कात असल्याचं त्यांनी म्हटलंय.
संग्राम जगताप यांना उमेदवारी जाहीर होताच त्यांचे वडील आमदार अरुण जगताप यांनी काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटलांवर जोरदार टीका केली. कोणाची खुन्नस काढणं आमचं काम नसून सर्वच जाती-धर्माच्या लोकांना सोबत घेऊन आम्ही काम करतो, अशी प्रतिक्रिया आमदार अरुण जगताप यांनी व्यक्त केली. तसेच चुकीची भाषा वापरणं आमचं काम नाही, तर दोन महिने संपले तर तुझं अमुक करू, असं म्हणत जगताप यांनी विखेंना टोला लगावला.
“मी कमी शिकलो असलो तरी त्याला महत्व नसून कोण किती कामे करतो त्याला महत्त्व आहे,” असं मत जगताप यांनी व्यक्त केलं. तसेच आयुर्वेदिक औषधाला वेळ लागतो, मात्र ते मुळासकट आजार काढतं, अशी टीका जगतापांनी विखेंवर केली. माझ्या संपर्कात राष्ट्रवादी आणि काँग्रेसच नव्हे, तर भाजपचे नेते देखील संपर्कात आहेत. त्यामुळे मोठी शक्ती आमच्यासोबत असल्याची प्रतिक्रिया अरुण जगताप यांनी दिली. उमेदवारी जाहीर होताच अरुण जगताप मुलासाठी कामाला लागले आहेत.