Manipur Govt Crisis | मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला सुरुंग, 9 आमदारांची बंडखोरी, तिघे काँग्रेसमध्ये

| Updated on: Jun 18, 2020 | 10:56 AM

भाजपकडे 23 सदस्यांचा पाठिंबा आहे. तिघांनी राजीनामा दिल्यामुळे भाजपचे 18, एनपीएफचे चार आणि लोजपचा एक असे आमदार आहेत.

Manipur Govt Crisis | मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला सुरुंग, 9 आमदारांची बंडखोरी, तिघे काँग्रेसमध्ये
Follow us on

इम्फाळ : मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला जबरदस्त हादरे बसले आहेत. भाजप समर्थक 6 आमदारांनी बंडखोरी केली, तर भाजपच्या तीन आमदारांनी राजीनामा देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. बिरेन सिंह सरकारला राज्यसभा निवडणुकांच्या तोंडावर मोठा धक्का मानला जात आहे. (BJP led Manipur govt on verge of collapse 9 MLAs withdraw support 3 BJP MLAs switching to Congress)

संगमा यांच्या नेतृत्वातील ‘नॅशनल पीपल्स पार्टी’च्या (एनपीपी) चार आमदारांनी पाठींबा काढून घेतला. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री वाय जॉयकुमार सिंग, कॅबिनेट मंत्री एन कायसी, एल जयंत कुमार सिंह आणि लेटपाओ होकीप यांनी मंत्रीपदाचा राजीनामा देऊन सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे.

सुभाषचंद्र सिंह, टीटी हॉकीप आणि सॅम्युएल जेंदाई या भाजपच्या तीन आमदारांनी पक्ष आणि आमदारकीचा राजीनामा देऊन विरोधीपक्ष काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

याशिवाय तृणमूल काँग्रेसचे एकमेव आमदार टी. रोबिंद्रो सिंह आणि अपक्ष आमदार शहाबुद्दीन यांनीही भाजपचा पाठिंबा काढून घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.

हेही वाचा : शिवसेना खासदार अनिल देसाई थोरातांच्या भेटीला, मुख्यमंत्र्यांच्या भेटीपूर्वीच नाराजी दूर करण्याचे प्रयत्न?

2017 मध्ये भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या सात (तत्कालीन) काँग्रेस आमदारांना सदनात प्रवेशावर बंदी आणण्याच्या मणिपूर हायकोर्टाच्या निर्णयामुळे सरकारमधील अस्थिरता अचानक वाढली आहे. राज्यसभा निवडणुकीत ते सात काँग्रेस आमदार मतदान करु शकणार नाहीत. मणिपूरमधील राज्यसभेच्या जागांसाठी उद्या (19 जून) निवडणुका होणार आहेत.

तत्पूर्वी भाजपप्रणित सरकारचे समर्थन करणारे आणि कॅबिनेट मंत्री झालेले काँग्रेसचे आमदार थ. श्यामकुमार सिंग यांना अपात्र ठरवण्यात आले. काँग्रेसच्या अन्य सात आमदारांच्या अपात्रतेची याचिका सभापती खेमचंद सिंग यांच्या न्यायाधिकरणाकडे आहे.

2017 मध्ये काय झालं?

2017 मध्ये झालेल्या मणिपूर विधानसभा निवडणुकीत 60 सदस्यीय विधानसभेत 28 जागांसह काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता, तर भाजपला 21 जागा मिळाल्या होत्या. परंतु भाजपला चार एनपीपी, चार एनपीएफ, एक लोजप, एक तृणमूल, एक अपक्ष आणि एक कॉंग्रेस बंडखोर अशा 12 जणांचा पाठिंबा मिळवून बहुमत गाठता आले. बिरेनसिंग सरकार स्थापन झाल्यानंतर काँग्रेसचे अन्य सात आमदारही सामील झाले.

थ. श्यामकुमार सिंग आणि इतर सात काँग्रेस आमदारांना राज्यसभेच्या निवडणुकीसाठी कोर्टाने अपात्र ठरवल्याने विधानसभेची सदस्यसंख्या 52 वर आली आहे.

भाजपकडे 23 सदस्यांचा पाठिंबा आहे. तिघांनी राजीनामा दिल्यामुळे भाजपचे 18, एनपीएफचे चार आणि लोजपचा एक असे आमदार आहेत.

काँग्रेसकडे स्वत:चे 20 आमदार आहेत. एका सदस्याला अपात्र ठरवण्यात आले आहे, तर सात बंडखोरांना बंदी घातली गेली. बिरेनसिंग सरकारकडून पाठिंबा काढून घेतलेल्या नऊ आमदारांचे पाठबळ मिळाल्यास कॉंग्रेसकडे 29 आमदारांची ताकद दिसेल. (BJP led Manipur govt on verge of collapse 9 MLAs withdraw support 3 BJP MLAs switching to Congress)