सोलापूर : ‘शरद पवार तुम्ही 15 वर्षात काय काम केलं याचा हिशोब द्या’, असं थेट आव्हान गृहमंत्री अमित शाह यांनी सोलापूरच्या सभेत शरद पवारांना दिलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या नेतृत्त्वात भाजपची ‘महाजनादेश यात्रा’ (BJP Mahajanadesh Yatra Second Phase) पार पडली. या यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याचा समारोप आज सोलापुरात झाला. यावेळी भाजपने सोलापुरात जोरदार शक्तीप्रदर्शन केले. महाजनादेश यात्रेच्या समारोपाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची (Amit Shah Solapur rally) प्रमुख उपस्थिती होती. यावेळी अमित शाहांनी विरोधकांवर सडकून टीका केली. तर पंतप्रधान मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचं कौतुकही केलं.
या सभेत अमित शाहांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे उस्मानाबादचे विद्यमान आमदार राणा जगजीतसिंह पाटील (NCP Rana jagjitsinh patil), राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) आणि काँग्रेसचे माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे (Jaikumar Gore) यांनी भाजपात प्रवेश केला.
पवार साहेब 15 वर्षांच्या कामाचा हिशोब द्या : अमित शाह
अमित शाहांनी त्यांच्या भाषणात राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर निशाणा साधला. हे दोन्ही पक्ष राजकारणाला घराणेशाही समजतात असा टोलाही अमित शाहांनी लगावला. शरद पवार यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात सरकार आलं, अजित पवार हे जलसंपदा मंत्री झाले. मात्र 74 हजार कोटीचा खर्च करुनही एक थेंब पाणी शेतकऱ्यांना मिळालं नाही. मात्र, आज मुख्यमंत्र्यांनी राज्यातील 22,000 गावांमध्ये पाणी पोहोचवलं आहे, असं म्हणत अमित शाह यांनी मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं.
केंद्रात आणि राज्यात आघाडीने फक्त घोटाळे केले. मात्र, मोदींवर अजूनही कुठल्याही घोटाळ्याचा आरोप झालेला नाही. मोदी आणि फडणवीस यांनी अत्यंत पारदर्शकपणे कारभार केला, त्यामुळेच आज महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. वसंतराव नाईक यांच्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनीच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून पाच वर्ष पूर्ण केली. त्यामुळे राज्याचा विकास झाला. जर चंद्रकांत पाटील यांनी भाजपचे दरवाजे विरोधकांसाठी खुले केले, तर विरोधी पक्षात फक्त शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण राहतील, अशी टीका शाहांनी केली.
शरद पवार तुम्ही पत्रकार परिषद घेऊन तुमच्या कामाचा हिशोब द्या. फडणवीस यांनी हिशोब दिला आहे. मात्र, तुम्ही पंधरा वर्षात महाराष्ट्राला काय दिलं, याचा हिशोब द्या, असं आव्हान शाहांनी पवारांना दिलं.
सर्जिकल स्ट्राईकवर राहुल गांधी फोटो मागत होते. मात्र, आता पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी स्वत: सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईक झाल्याचं मान्य केलं. देशाच्या हितासाठी सर्व राजकीय पक्षांनी एकत्र आलं पाहिजे. देशाच्या सुरक्षेत मतभेद नको, असंही शाह म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांना आणखी एक संधी द्या, पुन्हा भाजप-युतीच्या सरकारला पाठिंबा द्या, पुन्हा देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री बनवा, असे आवाहन शाह यांनी सोलापूरकरांना केले.
आम्ही विरोधात संघर्षाची आणि सत्तेत असताना संवादाची यात्रा काढतो : मुख्यमंत्री
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रेच्या समारोपाला अनेक मुद्यांवरुन विरोधकांवर निशाणा साधला, तर कलम 370 हटवल्याबाबत अमित शाह आणि मोदींचे आभारही मानले. “विरोधक विचारतात कामं केली तर यात्रा कशाला काढता? महाजनदेश यात्रा आमचं दैवत असलेल्या जनतेसाठी आहे. त्यांचं दर्शन घेण्यासाठी ही यात्रा आहे. आम्ही विरोधक असताना संघर्षाची आणि सत्तेत असताना संवादाची यात्रा काढतो, ही संवादाची यात्रा आहे, जनतेचा आशीर्वाद मागण्यासाठी ही यात्रा आहे”, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावलं.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेही यात्रा काढली. भाजपच्या यात्रेला पावसातही मैदान पुरत नाही आणि विरोधकांची मंगल कार्यालयंही भरत नाही, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.
यंदाही भाजप-सेना युतीचे सरकार येईल : मुख्यमंत्री
विरोधकांनी निवडणुका जिंकल्या तेव्हा ईव्हीएम चांगलं. मात्र, आता मोदी यांनी धोबीपछाड दिल्यावर विरोधकांना ईव्हीएममध्ये दोष दिसू लागले आहेत, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी ईव्हीएमच्या मुद्यावरुन काँग्रेस-राष्ट्रवादीला घेरलं. सुप्रिया सुळे निवडून आल्या तर ईव्हीएम चांगलं आणि आमचे जयसिद्धेश्वर जिंकले तर ईव्हीएम खराब. विरोधकांनो खराबी ईव्हीएममध्ये नाही तर तुमच्या डोक्यात आहे, अशी टीकाही मुख्यमंत्र्यांनी केली.
“येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पूर्वीपेक्षा चांगला विजय होईल. नवीन इतिहास घडेल. पुन्हा युतीचं सरकार येईल. दुसरा टप्पा संपला, मात्र तिसरा टप्पा घेऊन मी पुन्हा येईल”, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
जनतेचे आशीर्वाद घेण्यासाठी ही रॅली : चंद्रकांत पाटील
“ज्यांनी आम्हाला मतदान केलं, त्यांचे आभार मानण्यासाठी ही रॅली, त्यांना हिशोब देण्यासाठी ही रॅली आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी ही रॅली”, अशी भावना चंद्रकांत पाटील यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच, विरोधक जातीचं राजकारण करतात, अशी टीकाही चंद्रकांत पाटलांनी केली.
आज आघाडीच्या तिघांनी भाजप पक्षात प्रवेश केला. शरद पवार पत्रकार परिषदेत पत्रकारावर उखडले. त्यांना त्यांची जवळची माणसं निघून जात असल्याने त्यांच्या मनाचा तिळपापड आणि त्रागा झाल्याचं दिसून येत आहे, असा टोला चंद्रकांत पाटलांनी पवारांना लगावला. आम्ही पोरं पळवणारी टोळी नाही, कारण पक्षात प्रवेश केलेले पोरं नाहीत, असंही ते म्हणाले.
महाजानदेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याचा समारोप
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जालन्याहून निघालेल्या भाजपच्या महाजानदेश यात्रेचा आज सोलापुरात समारोप झाला. सोलापुरातल्या पार्क स्टेडियम येथे हा यात्रेचा समारोप कार्यक्रम पार पडला. यावेळी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आणि लोक येथे उपस्थित होते.
पाहा व्हिडीओ :