मुंबई : मागच्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) राष्ट्रवादीत नाराज असल्याची चर्चा होतेय. त्यावर आता भाजपच्या वतीने प्रतिक्रिया समोर आली आहे. भाजपच्या (BJP Maharashtra) अधिकृत ट्विटर हँडेलवरून एक ट्विट करण्यात आलं आहे. यात अमोल कोल्हेंच्या कथित नाराजीवर भाष्य करण्यात आलं आहे.
भाजपने ट्विटरवर एक फोटो शेअर केलाय. यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बडा घर पोकळ वासा! शरद पवारांच्या बैठकीला अमोल कोल्हे गैरहजर! पक्षांतर्गत गटबाजी आणि संघर्ष यामुळे शरद पवार यांच्या पक्षाचा आता पुण्यात निभाव लागणं निव्वळ अशक्य आहे!, असं भाजपच्या ट्विटमध्ये म्हणण्यात आलं आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बडा घर पोकळ वासा! pic.twitter.com/wCzCOv1jr5
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) January 6, 2023
अमोल कोल्हे मागच्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीच्या काही कार्यक्रमांना गैरहजर राहत आहेत. त्यामुळे ते राष्ट्ववादीवर नाराज आहेत. ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी राजकीय वर्तुळात चर्चा होतेय.आता भाजपने अधिकृतरित्या त्यावर भाष्य केलंय. त्यामुळे अमोल कोल्हे खरंच नाराज आहेत का? अन् असतील तर ते भाजपमध्ये जाणार का? या चर्चेचं वादळ अधिक वेगाने घोंघावतंय.
दरम्यान काही दिवसांआधी आपण नाराज असल्याची प्रतिक्रिया अमोल कोल्हे यांनी दिली होती.
दिलीप वळसे पाटील यांनी कोल्हे यांच्या कथित नाराजीवर भाष्य केलंय. मुळात राज्यामधील अपयश पचवण्यासाठी भाजप नेते वेगवेगळ्या क्लुप्त्या काढत आहेत. अमोल कोल्हे नाराज नाहीत. त्यांच्या नाराजीचा प्रश्नच येत नाही. 2024 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीला चांगलं यश मिळेल, असं वळसे पाटील म्हणालेत.
काही दिवसांआधी केंद्रीय रावसाहेब दानवे आणि अमोल कोल्हे यांची जालन्यात भेट झाली. रावसाहेब दानवे यांचे बंधू भास्कर दानवे यांच्या कन्स्ट्रक्शन कार्यालयाचं अमोल कोल्हे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात झालं. विशेष म्हणजे या उद्घाटनानंतर दोन्ही नेत्यांमध्ये दानवे यांच्या गाडीत तबल 25 मिनिटे गुप्त चर्चा झाल्याची माहिती आहे. या भेटीत नेमकी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा याची माहिती समोर आली नाहीये. पण या भेटीमुळे अमोल कोल्हे नाराज असल्याच्या चर्चा अधिक गडद झाल्या आहेत.