नवी दिल्ली : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना भाजपकडून नवी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. देवेंद्र फडणवीस यांना संघटन कौशल्यामुळे बिहारमध्ये नवी जबाबदारी मिळू शकते. बिहारचे प्रभारी म्हणून देवेंद्र फडणवीस काम पाहू शकतात. केंद्रीय नेतृत्त्वाला त्याबाबत विश्वास वाटतो. (Devendra Fadnavis may get new role for Bihar election)
बिहारमध्ये येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणुका होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजपची रणनीती सुरु झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांचं संघटन कौशल्य पाहता, त्यांना भाजपचे बिहार प्रभारी केलं जाऊ शकतं.
भाजपने महाराष्ट्रातील निवडणुका देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्त्वाखाली लढल्या होत्या. महाराष्ट्रात भाजपने सत्ता स्थापन केली नसली, तरी भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्व कौशल्याबाबत केंद्रातील नेत्यांना विश्वास आहे. त्याचाच भाग म्हणून देवेंद्र फडणवीस यांना बिहारमध्ये नवी जबाबदारी दिली जाऊ शकते.
बिहार विधानसभा निवडणूक
बिहारमध्ये 243 जागांसाठी विधानसभा निवडणूक होत आहे. बिहार विधानसभेची निवडणूक वेळेवरच घेतली जाईल, असं मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी यापूर्वीच स्पष्ट केलं आहे. त्यामुळे येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात या निवडणुका होणार हे निश्चित आहे. सध्या असलेलं कोरोनाचं संकट पाहता, या निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी काही राजकीय पक्षांनी केली होती, मात्र ही मागणी निवडणूक आयोगाने फेटाळली.
सध्या बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या नेतृत्त्वात जनता दल युनायटेड आणि भाजपचं सरकार आहे. नितीश कुमार यांनी यापूर्वी लालू प्रसाद यादव यांच्याशी हातमिळवणी करुन सरकार स्थापन केलं होतं. मात्र त्यांच्यात काडीमोड झाल्याने, त्यांनी पुन्हा भाजपची मदत घेऊन सरकार स्थिर केलं. त्यामुळे जेडीयू-भाजप विरुद्ध काँग्रेस आणि राजद अशी लढत बिहारमध्ये पाहायला मिळू शकते.
(Devendra Fadnavis may get new role for Bihar election)
संबंधित बातम्या
Devendra Fadnavis | चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर देवेंद्र फडणवीसांची सारवासारव