नवी दिल्लीः उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी ‘सामना’ चे संपादक संजय राऊत (Sanjay Raut) यांना दिलेली मुलाखत सध्या चांगलीच चर्चेत आहे. उद्धव ठाकरेंनी राऊतांच्या प्रश्नांना उत्तरं देताना भाजप, बंडखोर शिवसैनिकांवर जोरदार हल्ला चढवला. यावरून अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी मात्र उद्धव ठाकरेंना आव्हान दिलं आहे. त्यांना मुलाखत द्यायचीच असेल तर पब्लिकमध्ये येऊन द्यावी. लोकांमध्ये उतरून त्यांनी ही मतं मांडून दाखवावीत. बंद खोलीतून काय आरोप करता, असा सवाल रावसाहेब दानवे यांनी केलाय. हे म्हणजे मेरे गवाही मेरे भाई को पुछो.. असं झालं आहे. त्यांचेच प्रश्न, त्यांचीच उत्तरं, ही सगळी मॅच फिक्सिंग असल्याचा आरोप रावसाहेब दानवे यांनी केला आहे. तसेच राऊतांना मुलाखत घ्यायचीच असेल तर देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, राज ठाकरेंची घेऊन दाखवावी, असंही दानवे म्हणाले.
रावसाहेब दानवे यांनी उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर ताशेरे ओढले. ते म्हणाले, ‘ बंद खोलीत मुलाखत घेऊन काहीही बिनबुडाचे आरोप केले आहेत. शिंदेंनी पाठीत खंजीर खुपसला म्हणतात, 2019 मध्ये त्यांनी दगाफटका केला नाही? शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवेन, असं आश्वासन त्यांनी बाळासाहेब ठाकरेंना दिलं होतं. मग एकनाथ शिंदेंना हे पद का दिलं नाही. स्वार्थापोटी त्यांनी हे बिनबुडाचे आरोप केले आहेत… असं रावसाहेब दानवे म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पद मिळाल्यावरून उद्धव ठाकरेंनी मुलाखतीत उपरवाले की मेहरबानी.. असा टोमणा मारलाय यावर प्रतिक्रिया विचारली असता रावसाहेब दानवे म्हणाले, ते काहीही म्हणोत. त्यांच्या बोलण्यावर पक्ष चालत नाही. आम्ही एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री कसे बनवले हा प्रश्व त्यांना पडलाय. बिहारमध्येही भाजपकडे जास्त आमदार असूनही आम्ही नितीश कुमारांना मुख्यमंत्री पद दिलं आहे. तोच फॉर्मुला महाहाष्ट्रात लावला. आम्ही काय करावं हे उद्धव ठाकरेंनी सांगायची गरज नाही.
आज 27 जुलै रोजी उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस असून या निमित्ताने ‘सामना’ च्या माध्यमातून त्यांची दीर्घ मुलाखत प्रसिद्ध करण्यात आली आहे. शिवसेनेतून बाहेर गेलेले आमदार, खासदार आणि त्यांच्या पाठिशी असलेल्या भाजपावर उद्धव ठाकरेंनी जोरदार हल्लाबोल केला. एखाद्या झाडाचा पाला पाचोळा पानगळीत गळून जातो, त्यानंतर झाडाला कशी नवी पालवी फुटते, त्याप्रमाणेच शिवसेनेची सध्या पानगळ सुरु आहे. लवकरच शिवसेना पुन्हा बहरून येईल, असं आश्वासनही उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे. उद्धव ठाकरेंची ही मुलाखत गेल्या दोन दिवसांपासून तुफान चर्चेत आहे. विविध राजकीय पक्षांचे नेते यावर प्रतिक्रिया देत आहेत.