नवी दिल्ली : निवडणुका आल्या की अनेक नेते आपण शेतकरी पुत्र असल्याचं सांगत असतात. पण कर्नाटकातील एक भाजप आमदार आजही खरोखर शेतकरी पुत्र आहे हे दाखवणारे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. कर्नाटकच्या दक्षिण कन्नड जिल्ह्यतील बलथांगडीचे आमदार हरीश पुंजा यांचे 74 वर्षीय वडील आजही सर्वसामान्य शेतकऱ्याप्रमाणे शेती करतात. त्यांचा एक फोटो व्हायरल होतोय, ज्यात ते पांढरा शर्ट आणि लुंगीमध्ये सायकल घेऊन जात आहेत, ज्यात दुधाची किटली अडकवलेली आहे.
सोशल मीडियावर हा फोटो आणि त्यासोबतची माहिती वाचल्यानंतर युझर्सकडून हरीश पुंजा यांच्या वडिलांचं कौतुक केलं जातंय. निवडणुकांमध्ये तर प्रत्येक जण आपण शेतकरी पुत्र असल्याचा दावा करतो. पण प्रत्यक्षातही शेतकरी पुत्र राजकारणात दिसतात याबाबत काहींनी समाधान व्यक्त केलंय. आमदाराच्या वडिलांचं एवढं साधं राहून काहींना विश्वासही बसला नाही.
हरीश यांचे वडील मुथन्ना यांनी सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटोवर प्रतिक्रिया दिली. हा फोटो मी अजून पाहिला नसल्याचं ते म्हणाले. आम्ही आमच्या उपजिविकेसाठी शेतीवर अवलंबून आहोत. मी रोज शेतात जातो, जवळच एका डेअरीवर दूध विकण्यासाठीही जातो. हा सर्व माझा दिनक्रम आहे, असं मुथन्ना म्हणाले.
आपण एका गरीब आणि शेतकरी कुटुंबातून असल्याचं भाजप आमदार हरीश पुंजा यांनी सांगितलं. माझे वडील एक सर्वसामान्य शेतकरी आहेत आणि मी आमदार झाल्यानंतरही त्यांच्या जीवनात काहीही बदल झालेला नाही. त्यांचं जीवन हे शेती आणि दूध व्यवसायाभोवती आहे. ते सर्वसामान्य शेतकऱ्यांप्रमाणेच शेती करतात, असं हरीश पुंजा म्हणाले.