मुंबई: राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) पराभव झाल्यामुळे दुखावले गेलेले भाजप (BJP) नेते आता चांगलेच आक्रमक झाले आहेत. या निवडणुकीत केवळ काँग्रेस आणि राष्ट्रवादीलाच फायदा झाला आहे. शिवसेनेच्या (Shivsena) हाती काहीच लागलेले नाही, अशी वक्तव्ये आता भाजप नेत्यांकडून केली जात आहेत. यामध्ये आता शिवसेनेचे कट्टर विरोधक आणि भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनीही उडी घेतली आहे. (BJP leader Nitesh Rane taunts Shivsena over defeat in Amravati MLC election)
नितेश राणे यांनी शुक्रवारी ट्विट करत पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील भाजपचा पराभव मान्य केला. ठीक आहे आम्ही कमी पडलो. पण मुख्यमंत्री असलेल्या पक्षाला भोपळाही फोडता आली नाही. मित्रपक्षांनीच शिवसेनेच्या मृत्यूचा सापळा रचला आहे. बाकी मैदानात परत भेटूच, असे नितेश राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यामुळे आता शिवसेनेच्या गोटातून नितेश राणे यांच्या या टीकेला कशाप्रकारे प्रत्युत्तर दिले जाणार, हे पाहावे लागेल.
ठीक आहे आम्ही कमी पडलो!
पण ज्यांचा मुख्यमंत्री त्यांना भोपळा..
मित्र पक्षानीच रचला मृत्यूचा सापळा..
बाकी मैदानात परत भेटूच !!— nitesh rane (@NiteshNRane) December 4, 2020
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेनेकडून केवळ अमरावतीत एकमेव जागेवर उमेदवार उभा करण्यात आला होता. तर उर्वरित जागांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे उमेदवार होते. हे सर्व उमेदवार निवडून आले असले तरी अमरावतीत शिवसेनेच्या श्रीकांत देशपांडे यांचा पराभव होण्याची दाट शक्यता आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांचे नातेवाईक असलेल्या आणि अपक्ष निवडणूक लढवणाऱ्या किरण सरनाईक यांच्याकडून श्रीकांत देशपांडे यांना पराभव स्वीकारावा लागू शकतो. त्यामुळे आता भाजपच्या नेत्यांकडून शिवसेनेला डिवचले जात आहे.
पुणे आणि नागपूर पदवीधरची जागा गमावल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हिंमत असेल तर एकएकटे लढा असं आव्हान महाविकास आघाडीतील घटकपक्षांना केलं आहे. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचं खच्चीकरण झालंय. तर राष्ट्रवादीने आपली संघटना मजबूत केली आहे, असं वक्तव्य करत त्यांनी शिवसेनेला एकप्रकारे सूचक इशाराच दिलाय. तर पुण्यात आणि नागपुरात अपक्ष उमेदवाराने अजून काही मतं घेतली असती तर विजय आमचाच होता, असं म्हणत पाटील यांनी आपला पराभव मान्य केला आहे.
संबंधित बातम्या:
आम्ही एक तरी जिंकलो, पण ज्यांचा मुख्यमंत्री आहे, त्यांची एकही जागा नाही : देवेंद्र फडणवीस
‘भाजपने पुण्याची हातातली जागा गमावली तर चंद्रकांत पाटलांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा’
(BJP leader Nitesh Rane taunts Shivsena over defeat in Amravati MLC election)