मुंबई : भाजपचे नेते आणि आमदार प्रसाद लाड यांनी कृष्णकुंजवर जाऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. आमदार प्रसाद लाड यांच्या भेटीचं कारण अद्याप स्पष्ट नाही. मात्र येत्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि मनसेची जवळीक वाढत असल्याची चर्चा आहे. त्यानिमित्ताने ही भेट तर नाही ना असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे. (BJP MLA Prasad Lad meet MNS leader Raj Thackeray at KrishnaKunj)
प्रसाद लाड हे जवळपास पाऊण तास राज ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या कृष्णकुंजवर होते. या दोघांमधील चर्चेचा तपशील अद्याप समजलेला नाही. मात्र कृष्णकुंजवरुन बाहेर येताच प्रसाद लाड यांनी भारतीय जनता पार्टीचा निर्धार, मुंबई महापालिकेवर भाजपचा झेंडा, अशी बोलकी प्रतिक्रिया दिली. मात्र यावेळी प्रसाद लाड यांनी राज ठाकरे यांच्यासोबतची भेट ही वैयक्तिक होती असं नमूद केलं. माझे आणि राज ठाकरे यांचे वैयक्तिक संबंध आहेत, असं प्रसाद लाड म्हणाले.
शिवसेनेची परंपरागत सत्ता खाली करण्यासाठी जे करता येईल ते करु, असा निर्धारही प्रसाद लाड यांनी व्यक्त केला.
दरम्यान, शिवसेनेने भाजपची साथ सोडल्यानंतर, भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे. मुंबई महापालिकेतील शिवसेनेची सत्ता उलथवून टाकण्याचा निर्धार भाजपने केला आहे. भाजपने मुंबई महापालिका निवडणुकीसाठीचं ‘भाजप येणार, मुंबई घडवणार’ हे घोषवाक्य (BJP’s Slogan BMC election) जाहीर केलं आहे. तसेच या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा मुंबई सेवा सेतूचं उद्घाटन केलं आहे. मुंबई महापालिकेवर भाजपचा भगवा फडकवण्याचा निर्धार देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजप आणि मनसेची जवळीक वाढली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. मध्यंतरीच्या काळात राज्यातील इतर निवडणुकांमध्ये शिवसेनेची घसरण झाली असली तरी आजवर सेनेचा मुंबई महानगरपालिकेचा किल्ला अभेद्य राहिला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या नाकावर टिच्चून महानगरपालिकेची आगामी निवडणूक जिंकायचीच, असा चंग यंदा भाजपने बांधला आहे.
दरम्यान, मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेसोबत युती करण्याचे भाजप नेत्यांकडून संकेत देण्यात येत असले तरी भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मनसेसोबतच्या युतीचे वृत्त फेटाळून लावले होते. आगामी सर्व निवडणुका भाजप स्वबळावर लढणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी दोन महिन्यापूर्वी स्पष्ट केलं होतं.
VIDEO :
(BJP MLA Prasad Lad meet MNS leader Raj Thackeray at KrishnaKunj)
संबंधित बातम्या
भाजप नेते आणि राज ठाकरेंच्या भेटीगाठी वाढल्या, शेलार पुन्हा कृष्णकुंजवर
मुंबई महापालिका निवडणुकीत ‘बिहार पॅटर्न’?, शेलारांचे संकेत; शिवसेनेसाठी धोक्याची घंटा
आशिष शेलारांनी महापालिका निवडणुकीचं शंख फुंकलं, BMC वर झेंडा फडकवण्याची तयारी सुरु