सुजय विखे भाजपात, शिवाजी कर्डिले पुन्हा किंगमेकर ठरणार?

| Updated on: Jul 05, 2019 | 4:17 PM

अहमदनगर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे यांनी अखेर भाजपचा झेंडा हातात घेतला. भाजपने त्यांना अहमदनगरमधून लोकसभेचं तिकीट देण्याची घोषणाही केली आहे. यानिमित्ताने नगरचं राजकारण पुन्हा एकदा देशाच्या नकाशावर आलंय. यामध्ये आता नगरमधील स्थानिक नेतेमंडळी किंगमेकर ठरणार आहेत. या सर्वात महत्त्वाचं नाव म्हणजे भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले.. कर्डिले हेच नगरच्या […]

सुजय विखे भाजपात, शिवाजी कर्डिले पुन्हा किंगमेकर ठरणार?
Follow us on

अहमदनगर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे यांनी अखेर भाजपचा झेंडा हातात घेतला. भाजपने त्यांना अहमदनगरमधून लोकसभेचं तिकीट देण्याची घोषणाही केली आहे. यानिमित्ताने नगरचं राजकारण पुन्हा एकदा देशाच्या नकाशावर आलंय. यामध्ये आता नगरमधील स्थानिक नेतेमंडळी किंगमेकर ठरणार आहेत. या सर्वात महत्त्वाचं नाव म्हणजे भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले.. कर्डिले हेच नगरच्या राजकारणात किंगमेकर ठरत असल्याचं गेल्या काही दिवसांपासून पाहिलंय. त्यामुळे या लोकसभेलाही त्यांच्यावर सर्वांची नजर आहे.

वाचा – अहमदनगर : तीन मुली तीन पक्षात, म्हणूनच कर्डिले किंगमेकर!

सूत्रांच्या मते, सुजय विखेंना भाजपात घेण्यासाठी कर्डिले फारसे उत्सुक नव्हते. पण सुजय विखेंच्या भाजप प्रवेश सोहळ्यासाठी कर्डिलेंचीही उपस्थिती होती. भाजपने शक्तीप्रदर्शन करत सुजय विखेंचं पक्षात स्वागत केलं. यावेळी नगरमधील सर्व आमदार आणि महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमात कर्डिलेही खुश दिसत होते. त्यामुळे त्यांच्यावर सुजय विखेंना निवडून आणण्याची जबाबदारी टाकल्याचं बोललं जात आहे.

पुन्हा नात्या-गोत्यांचं राजकारण जिंकणार?

नगरमध्ये एक अंदाज असाही लावला जातोय, की राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी आमदार अरुण जगताप यांनी लोकसभेचं तिकीट दिलं जाऊ शकतं. अरुण जगताप हे शिवाजीराव कर्डिले यांचे व्याही आहेत. राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप हे कर्डिलेंचे जावई आहेत. त्यामुळे या नात्या-गोत्यांच्या राजकारणात नगरमध्ये खरी उत्सुकता राष्ट्रवादीने उमेदवार जाहीर केल्यानंतर निर्माण होणार आहे.

किंगमेकर शिवाजीराव कर्डिले

अहमदनगर शहर कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतं. मात्र सध्या चर्चा आहे ती इथल्या सोयऱ्या-धायऱ्यांच्या राजकारणाची. नगरचे राजकारण हे तीन परिवांच्या अवती-भोवती फिरत असतं. कोतकर-जगताप आणि कर्डिले हे सर्वच वेगवेगळ्या पक्षात आहेत. मात्र प्रत्यक्षात मात्र सर्वच एकत्र.

भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांना तीन मुली आहेत. पहिली मुलगी कोतकरांच्या घरात, तर दुसरी जगतापांच्या घरात आणि तिसरी मुलगी शिवसेनेच्या गाडे परिवारात दिली आहे. त्यामुळे हे तीनही परिवार राजकारणात कोणत्याही पक्षाचे असले तरी राजकीय स्वार्थासाठी आतून एकत्रच असतात. यात नेहमीच किंगमेकरच्या भूमिकेत असतात ते आमदार शिवाजी कर्डिले.

कसं आहे सोयऱ्या-धायऱ्यांचं राजकारण?

कार्डिलेंचे मोठे जावई संदीप कोतकर काँग्रेसचे माजी महापौर, तर कर्डिलेंची मुलगी सुवर्णा कोतकर या देखील काँग्रेसच्या माजी उपमहापौर आणि सध्या नगरसेविका आहेत.

कार्डिलेंचे दुसरे जावई संग्राम जगताप हे राष्ट्रवादीचे आमदार आहेत. तर कर्डिलेंची दुसरी मुलगी शीतल जगताप देखील नगरसेविका आहेत.

आता तिसऱ्या मुलीनेही राजकारणात प्रवेश केलाय. कर्डिले यांचे तिसरे जावई अमोल गाडे, आता त्याची पत्नी ज्योती गाडे या शिवसेनेच्या गाडे परिवारातील असून राष्ट्रवादीकडून निवडून आल्या आहेत.

कर्डिले हे राहुरी मतदारसंघाचे आमदार असून नगर तालुक्यतील बुऱ्हानगर भागात राहतात. मात्र त्यांचे काही मतदार हे नगर तालुक्यात आणि शहराच्या काही भागात येतात. त्यामुळे नगर शहराच्या राजकारणात त्यांचं मोठं वर्चस्व मानलं जातं. तर त्यांचे व्याही भानुदास कोतकरांचे केडगाव भागात वर्चस्व आहे. गेल्या 40 वर्षांपासून केडगाव परिसरात कोतकर कुटुंबाची दहशत आहे. भानुदास कोतकर यांना तीन मुलं आहेत, तर मोठ्या मुलाची पत्नी ही कर्डिले यांची मुलगी आहे. त्यामुळे कोतकर कोणत्याही पक्षात असले तरी त्याला आतून कर्डिलेंचा पाठींबा असतोच, अशी चर्चा शहरात नेहमीच असते.

बाजार समितीच्या राजकारणात कर्डिले आणि कोतकर हे आपल्या हातात सत्ता रहावी यासाठी आपल्या सोयीनुसार राजकारण करतात. महापालिका निवडणुकीत देखील कार्डिलेंचे दुसरे व्याही आमदार अरुण जगताप यांचं वर्चस्व आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत कर्डिले आणि जगताप यांची छुपी युती असल्याची चर्चा शहरात नेहमीच असते. त्यामुळे पक्ष कोणतेही असो, किंगमेकारच्या भूमिकेत कर्डिलेंचंच नाव पुढे येत असतं.

नगरमधील राजकीय समीकरणे

अहमदनगर दक्षिण मतदारसंघ हा खरं तर आघाडीचा बालेकिल्ला. सहकार साखर कारखानदारी, दूध व्यवसाय, शिक्षण संस्था आणि सहकाराचं घट्ट जाळं या मतदारसंघावर आहे. मात्र खासदार दिलीप गांधी यांनी गटबाजीचा फायदा घेत भाजपाचं खातं खोललं. गेल्या दोन टर्मपासासून ते खासदार आहेत. आघाडीत राष्ट्रवादीकडून ही जागा 2014 ला लढवण्यात आली. पण मोदी लाटेत गांधींच्या प्रतिस्पर्धी उमेदवाराचा सुपडासाफ झाला.

अहमदनगर दक्षिण मतदारसंघ अत्यंत संवेदनशील मतदारसंघ आहे. या मतदारसंघात विधानसभेचे सहा मतदारसंघ येतात. एक खासदार आणि तीन आमदारांसह भाजपचं प्राबल्य आहे. राष्ट्रवादी तीन आमदारांसह दुसर्‍या स्थानावर, तर शिवसेना आणि काँग्रेस एका आमदारासह तिसर्‍या स्थानी आहे.

मतदारसंघानुसार पक्षीय बलाबल

राहुरी – शिवाजी कर्डीले, भाजप

शेवगाव-पाथर्डी – मोनिका राजळे, भाजप

कर्जत – जामखेड – राम शिंदे, भाजप

नगर शहर – संग्राम जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस

पारनेर – विजय औटी, शिवसेना

श्रीगोंदा – राहुल जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस