मुंबई : “ठाकरे सरकार कोरोना संकट हाताळू शकत नाही. या सरकारची क्षमता नाही. हे सरकार कोरोनाचा सामना करण्यास अपयशी ठरलं आहे. त्यामुळे राज्यपालांनी या सरकारला नारळ देऊन राष्ट्रपती राजवट आणावी”, अशी मागणी भाजप खासदार नारायण राणे यांनी राज्यपालांकडे केली. हे सरकार लोकांचा जीव वाचवण्यास, उदरनिर्वाह करण्यास सक्षम नाही, असा हल्लाबोल राणेंनी केला. (Narayan Rane demands president rules in Maharashtra)
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सरकार चालवण्यात सक्षम नाही. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा, सरकारी रुग्णालये लष्कराच्या ताब्यात द्यावीत. कोरोनामुळे राज्यावर गहिरं संकट आहे, असं नारायण राणे म्हणाले.
आतापर्यंत जे काही दिलंय ते केंद्र सरकारने दिलं आहे. हे कुठल्या प्रकारचे राजकारण आहे हे न समजण्यापलिकडे आहे. या सरकारचा अभ्यास नाही, सरकारी अधिकाऱ्यांना कसं हाताळावं, त्यांचे प्राण कसे वाचवावे, पोलिसांना संरक्षित कसं ठेवावं याचा अभ्यास नाही. त्यामुळे असा कारभार सुरु आहे, असंही राणे म्हणाले. (Narayan Rane demands president rules in Maharashtra)
नारायण राणे काय म्हणाले?
सध्या महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिती गंभीर होत आहे. रुग्ण आणि मृत्यू वाढत आहेत. राज्यपालांनी याकडे गांभीर्याने पाहावं आणि महाराष्ट्रात-मुंबईत होणारे मृत्यू थांबवावेत. या दृष्टीने प्रयत्न करावेत. काही सूचनाही केल्या. मनपा आणि राज्य सरकारच्या रुग्णालयांची अवस्था वाईट आहे. अनेक रुग्णांना अॅडमिट न केल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. अशा परिस्थितीत सरकारचं लक्ष नाही असं म्हणणार नाही, त्यांचं हे काम नाही. हे सरकार ही परिस्थिती हाताळू शकत नाही.
हजाराच्या जवळपास मृत्यू झाले हे पाहता हे सरकार कोरोनाचा सामना करण्यासाठी अपयशी ठरलं आहे. म्हणून राज्यपालांनी या सरकारचा विचार करावा आणि परिस्थिती आरोग्याच्या दृष्टीने, सेवा देण्याच्या दृष्टीने त्यांना सूचना केली की महापालिका आणि राज्य सरकारची हॉस्पिटल लष्कराच्या ताब्यात द्यावी, तरच परिस्थिती सुधारु शकते, असं मी सांगितलं.
लष्कराच्या ताब्यात केवळ रुग्णालये नव्हे तर राज्य का देऊ नये? हे सरकार उपाययोजना करु शकत नाही, प्राण वाचवू शकत नाही. या सरकारची कोरोनाचा सामना करण्याची क्षमता नाही, त्यामुळे यांना नारळ द्यावा आणि राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी.
लोकांची उपासमार सुरु आहे, लोकांना रोजगार नाही, अन्न धान्य नाही, परीक्षा नाहीत. काहीही निर्णय विचारपूर्वक न घेता बंद बंद, स्थगिती स्थगिती असं सुरु आहे. त्यामुळे हे सरकार मुख्यमंत्री आणि मंत्री हे सरकार चालवायला, लोकांचा जीव वाचवायला, लोकांचा उदरनिर्वाह चालवायला, सक्षम नाहीत.
आतापर्यंत जे काही दिलंय ते केंद्राने दिलंय, यांनी काय दिलंय? यांचं धोरण काय? यांना अभ्यास नाही, इन्कम कुठून निर्माण करावा, कुठे खर्च करावा, सरकारी अधिकाऱ्यांना कसं हाताळावं, त्यांचे प्राण कसे वाचवावे, पोलिसांना संरक्षित कसं ठेवावं याचा अभ्यास नाही. त्यामुळे असा कारभार सुरु आहे, असंही राणे म्हणाले.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी लोकांच्या हिताचे निर्णय घ्यावेत, मात्र यांच्याकडून काहीच होत नाही. नाचता येईना अंगण वाकडं, अशी सत्ताधाऱ्यांची स्थिती आहे.