मुंबई: जळगावच्या राजकारणाचा अविभाज्य भाग असलेल्या खडसे कुटुंबीयांच्या भूमिका हा नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. यापैकी रक्षा खडसे (Raksha Khadse) या दोन टर्म भाजपच्या खासदार झाल्या आहेत. 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्या रावेर मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेल्या आहेत. हिना गावित यांच्यासोबत रक्षा खडसे या 17 व्या लोकसभेतील सर्वात तरुण सदस्यांपैकी एक आहेत. (BJP MP Raksha Khadse Political Journey)
रक्षा खडसे यांचा जन्म 12 मे 1987 रोजी झाला होता. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांचे लग्न एकनाथ खडसेंचे दिवंगत पुत्र निखिल खडसे यांच्याशी झाले होते. निखिल खडसे यांनी आत्महत्या केल्यानंतर रक्षा खडसे यांनी राजकारणात पाऊल ठेवले. त्यांनी कोथळी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदापासून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली.
2011 मध्ये झालेल्या विधान परिषदेच्या जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मनिष जैन यांनी एकनाथ खडसेंचे दिवंगत पुत्र निखिल खडसे यांचा पराभव केला होता. तेव्हापासून जैन आणि खडसे यांच्यात कट्टर वाद सुरु झाला. विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर वर्षभरातच निखिल खडसेंनी आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. तेव्हापासून जैन आणि खडसेंमधील वाद विकोपाला पोहोचला होता.
रक्षा खडसे यांनी 2014 च्या निवडणुकीत एकप्रकारे आपल्या दिवंगत पतीच्या पराभवाचा वचपा काढला होता.
2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी रावेर मतदारसंघातून मनिष जैन यांना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळाली होती. भाजपकडून हरिभाऊ जावळे यांना उमेदवारी मिळालेली होती. अशात, ईश्वरलाल जैन यांनी ही निवडणूक खडसेंविरोधात असती तर मजा आली असती, असं वक्तव्य केले. खडसेंनी ते मनावर घेतलं. विधानसभेचे तत्कालीन विरोधी पक्षनेते आणि प्रदेश भाजपातील महत्त्वाचे नेते म्हणून खडसेंच्या शब्दाखातर हरिभाऊ जावळेंची उमेदवारी रद्द झाली. त्यांच्याऐवजी खडसेंच्या स्नुषा रक्षा खडसे यांना भाजपने उमेदवारी जाहीर केली. या निवडणुकीत रक्षा खडसे यांनी मनिष जैन यांचा दणदणीत पराभव केला होता.
एकनाथ खडसे यांनी गेल्यावर्षी भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर एकनाथ खडसे यांच्या मुलीनेही राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला होता. मात्र, रक्षा खडसे यांनी भाजपमध्येच राहणे पसंत केले होते. मी भारतीय जनता पक्षातच राहणार आहे. भाजपला सोडणार नाही. एकनाथ खडसे यांनी त्यांच्या व्यक्तिगत कारणांमुळे भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. मला भाजपमध्ये कुठलाही त्रास नाही, असे रक्षा खडसे यांनी त्यावेळी म्हटले होते.
राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसे पहिल्यांदाच आपल्या मूळगावी कोथळी गावी आले होते. यावेळी ढोलताशांच्या गजरात आणि फटाक्यांची आतषबाजी करत त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांनी नाथाभाऊंचं औक्षण करून त्यांचं घरी स्वागत केलं. रक्षा खडसे या नाथाभाऊंच्या स्नुषा असल्या तरी त्या भाजपच्या खासदार आहेत. पक्ष बदलल्यानंतर खडसे गावी परतल्यानंतर त्यांचं रक्षा खडसे यांनी स्वागत केल्याने त्याची जोरदार चर्चा रंगली होती.
(BJP MP Raksha Khadse Political Journey)