सांगली : भाजप खासदार संजय काका पाटील (BJP MP Sanjaykaka Patil) यांना सांगलीचे पालकमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील (NCP Jayant Patil) यांनी जवळ बोलावून आग्रहाने जवळ बसवले. संजयकाका नको नको म्हणत असताना, जयंत पाटलांनी त्यांना जवळ बसवून घेतले. त्यानंतर दोघांमध्ये जवळपास 15 मिनिटं चर्चा रंगली. सांगली जिल्हा परिषदेच्या ‘माझी शाळा आदर्श शाळा अभियान’ कार्यक्रमाच्या प्रसंगी दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर आले होते.
सांगलीचे भाजपचे खासदार संजयकाका पाटील (BJP MP Sanjaykaka Patil ) भाजपमध्ये नाराज असल्याच्या चर्चा अनेक दिवसांपासून रंगू लागल्या आहेत. भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांच्या दौर्यात खासदार संजयकाका हे अनुपस्थित राहिले याचीसुद्धा अनेक उदाहरण आहेत. मात्र जलसंपदा मंत्री आणि सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या दौर्याच्यावेळी खासदार संजयकाका पाटील आवर्जून उपस्थित राहतात.
आज सुद्धा सांगलीतील एका कार्यक्रमाच्या निमित्ताने राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार संजयकाका पाटील एकाच व्यासपीठावर एकत्र आले होते. स्टेजवर आवर्जून जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी खासदार संजयकाका पाटील यांना आपल्या जवळ बोलवून बसवलं. आणि या दोन नेत्यांमध्ये बराच वेळ चर्चा सुरू होती. यापूर्वी सुद्धा एका बंद खोलीतून दोन नेते एकत्र बाहेर आले होते.
व्यासपीठावर लांब बसतो म्हणणाऱ्या भाजप खासदार संजय काका पाटील यांना मंत्री जयंत पाटील यांनी जवळ बोलावून आग्रहाने जवळ बसवले. संजय काका नको म्हणत असताना जवळ बसवून घेतले.
2014 साली संजयकाका पाटील भाजपमधून लोकसभेवर 2 लाख 38 हजार मतांनी निवडून गेले होते. त्यांनी काँग्रेस नेते आणि तत्कालिन केंद्रीय राज्यमंत्री प्रतिक पाटील यांचा पराभव केला होता. संजयकाका पाटील दिवंगत आर आर पाटील यांच्या नेतृत्वाच सांगलीमध्ये काम करत होते. मात्र 2014 साली त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राम राम करत भाजपात प्रवेश केला होता. दिवंगत आर आर आबांचे ते पक्षांअंतर्गत शत्रू मानले जात होते. त्यातूनच त्यांनी राष्ट्रवादीला राम राम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला होता.
VIDEO
(BJP MP Sanjaykaka Patil attended NCP Jayant Patil program at sangli)