नवी दिल्ली: साताऱ्यातील भाजपचे नेते आणि राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले (Udyanraje Bhosle) यांचा मनमोकळा स्वभाव हा सगळ्यांनाच माहिती आहे. उदयनराजे भोसले कधी काय करतील किंवा बोलतील याचा नेम नसतो. आतादेखील त्यांच्या अशाच एका कृतीची सोशल मीडिया आणि राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. (Udyanraje Bhosle meets Nana Patole outside Sonia Gandhi residence)
काही दिवसांपूर्वीच नाना पटोले (Nana Patole) यांची काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाली. त्यानंतर नाना पटोले सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची सदिच्छा भेट घेण्यासाठी त्यांच्या 10 जनपथ या निवासस्थानी गेले होते. नेमक्या त्याचवेळी खासदार उदयनराजे भोसले यांची गाडी त्याच परिसरातून जात होती. तेव्हा उदयनराजेंनी नाना पटोले यांनी गाडीतून पाहिले आणि त्यांनी ड्रायव्हरला गाडी थांबवायला सांगितली.
यानंतर उदयनराजे यांनी गाडीतून उतरून थेट नाना पटोले यांनी भेट घेतली. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल उदयनराजेंनी त्यांचे अभिनंदन केले. यानंतर एकमेकांची जुजबी विचारपूस करुन हे दोन्ही नेते आपापल्या दिशांना मार्गस्थ झाले. साधारण तीन दिवसांपूर्वी ही भेट झाली होती. त्याबद्दल अनेकांना माहितीदेखील नव्हती. मात्र, आता या भेटीचे छायाचित्र समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळाच्या भुवया नेहमीप्रमाणे उंचावल्या आहेत. तसेच तर्कवितर्कांना उधाणही आले आहे. यावर नाना पटोले आणि उदयनराजे भोसले यांनी अद्याप कोणतेही भाष्य केलेले नाही.
या सगळ्या घटनाक्रमाच्या पार्श्वभूमीवर नाना पटोले यांनी केलेले एक वक्तव्यही चर्चेचा विषय ठरत आहे. काँग्रेसला बळकटी देण्यासाठी इतर पक्षातील नेत्यांना सामावून घेण्याच्या दिशेनं काम सुरू आहे. जस्ट वेट अॅण्ड वॉच..’ पुढे आश्चर्यकारक धक्के देऊ, असे नाना पटोले यांनी म्हटले होते. त्यामुळे या वक्तव्याचा आणि उदयनराजेंशी झालेल्या भेटीचा काही संबंध आहे का, असा प्रश्न राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात विचारला जात आहे.
खासदार उदयनराजे भोसले यांनी शुक्रवारी साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांचीही भेट घेतली होती. या भेटीत सातारा जिल्ह्याचे प्रश्न मार्ग लावण्यासाठी सामूहिकरित्या संसदेत मांडण्याबाबत चर्चा झाल्याचं उदयनराजे यांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितलं. श्रीनिवास पाटील यांनी सातारा लोकसभा मतदारसंघातून उदयनराजे यांचा पराभव केला होता. पण शुक्रवारी उदयनराजे यांनी पाटील यांची भेट घेऊन मतदारसंघातील प्रश्नांबाबत चर्चा केली.
संबंधित बातम्या:
खासदार उदयनराजे भोसले योगी आदित्यनाथांच्या भेटीला, शिवरायांची ‘राजमुद्रा’ भेट
(Udyanraje Bhosle meets Nana Patole outside Sonia Gandhi residence)