उत्तर प्रदेश | 18 मार्च 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येत आहे. उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाच्या उमेदवारांचीही एक यादी जाहीर झाली आहे. या यादीमध्ये भाजप खासदार वरुण गांधी यांना पिलीभीत मतदार संघातून तिकीट जाहीर करण्यात आले आहे. समाजवादी पक्षाची ही यादी मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. गेले काही महिने पक्षाविरोधात बोलणारे वरुण गांधी यांना या निवडणुकीत उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे वरून गांधी यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला की काय अशीही चर्चा उत्तर प्रदेशमध्ये होत आहे.
समाजवादी पक्षाच्या उमेदवार यादीमध्ये वरुण गांधी यांच्यासोबत आणखी दोन नावे आहेत. ही यादी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. या यादीत वरुण गांधी यांना पीलीभीतमधून पुन्हा सपाच्या तिकिटावर उमेदवार करण्याचा दावा करण्यात आला आहे. यासोबतच जौनपूरमधून श्रीकला रेड्डी आणि मछली शहरातून रागिणी सोनकर यांना तिकीट देण्यात आल्याचे यादीत म्हटले आहे. श्रीकला रेड्डी या माजी खासदार धनंजय सिंह यांच्या पत्नी आहेत. ही यादी पोस्ट झाल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
ही यादी आल्यानंतर भाजप खासदार वरुण गांधी समाजवादी पक्षात सामील झाले आहेत की काय, अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे. यावेळी ते सपाच्या तिकिटावर निवडणूक लढवणार का? त्यांचे तिकीट भाजपकडून कापले जाणार हे निश्चित झाले आहे का? असे प्रश्न उपस्थित झाले आहे. मात्र, या दाव्यात किती तथ्य आहे याचे उत्तर समाजवादी पक्षाने दिले आहे.
वरुण गांधींना सपाचे तिकीट देण्याच्या दाव्यावर सपाच्या प्रवक्त्यांनी अशी कोणतीही यादी जाहीर करण्यात आलेली नाही असे स्पष्ट केले आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली ही यादी बनावट आहे, त्यापासून सावध राहा, असे पक्षाने म्हटले आहे.
समाजवादी पक्षाने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर ‘कृपया सावधगिरी बाळगा! समाजवादी पक्षाच्या लोकसभा उमेदवारांची यादी फक्त पक्षाच्या पेजवर पाठवली जाते. जी यादी पक्षाच्या एक्स आणि फेसबुक पेजवर आहे ती अधिकृत आहे आणि इतर सर्व याद्या बनावट आहेत, असे म्हटले आहे.
दरम्यान, पक्षविरोधी वक्तव्यांमुळे वरुण गांधी अनेकदा चर्चेत आले आहेत. त्यामुळे त्यांचे यावेळी तिकीट कापण्याची शक्यता असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. भाजपने वरुण गांधी यांच्या पिलीभीत मतदारसंघातून आपला उमेदवार जाहीर केलेला नाही. तर, सपानेही अशी कोणतीही घोषणा केलेली नाही. त्यामुळे वरुण गांधी यांचे भाजपने तिकीट नाकारले तर सपा त्यांना रिंगणात उतरवू शकते, अशीही एक अटकळ बांधली जात आहे.