गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर : भाजपनं (BJP) आगामी लोकसभा निवडणुकीची (Election) तयारी करण्यास आतापासूनच सुरुवात केली आहे. सेक्यूलर पक्षांच्या प्रचाराचा सामना करण्यासाठी भाजपने विशेष रणनिती आखली आहे. तब्बल 3 लाख मुस्लिम कार्यकर्त्यांना भाजप (Muslim Workers in BJP) विशेष प्रशिक्षण देणार आहे. या प्रशिक्षणातून भाजप आपल्या कार्यकर्त्यांना तयार करणार आहे. अपप्रचार कऱणाऱ्यांना उत्तर देण्यासाठी कार्यकर्त्यांना या विशेष प्रशिक्षणातून धडे दिले जाणार आहेत. भाजप राष्ट्रीय अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष जमाल सिद्धीकी यांनी याबाबतची माहिती दिली. ते नागपुरात टीव्ही 9 मराठीसोबत बोलत होते.
देशभरातील भाजप प्रत्येक जिल्ह्यातील आपल्या निवडक मुस्लिम कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देणार आहे. यात महाराष्ट्रातील 12 हजार अल्पसंख्य कार्यकर्त्यांचा समावेश असणार आहे, अशी माहिती जमाल सिद्धीकी यांनी दिली.
भाजप मुस्लिम विरोधी असल्याचा अपप्रचार करणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला भाजपचे मुस्लिम कार्यकर्ते उत्तर देतील. कार्यकर्त्यांना अपप्रचार देणाऱ्यांना उत्तर देण्यासाठी तयार करण्याचं प्रमुख उद्दीष्ट या प्रशिक्षणातून साध्य करण्याचा प्रयत्न असेल, असं सिद्धीकी यांनी म्हटलंय.
प्रशिक्षण घेतलेले मुस्लिम कार्यकर्ते अल्पसंख्यांक समाजाच्या घरोघरी जाणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली. सेक्युलर पक्षांच्या प्रचाराचा सामना कऱण्यासाठी भाजपने ही विशेष रणनिती आखली असल्याचंही ते म्हणाले.
आरएसएसच्या कार्यक्रमाला हजेरी लावण्यात आल्यात नुकतीच जमाल सिद्धीकी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या प्रकरणी त्यांनी पोलीस स्थानकात तक्रारही दिलीय. त्यानंतर आता जमाल सिद्धीकी यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून तयारी सुरु करण्यात आली असल्याचं म्हटलं.