मुंबई: भाजपकडून मुंबई महानगरापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी (BMC Election) आता मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी मुंबई भाजप कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. दादरच्या वसंतस्मृती येथील कार्यालयात ही बैठक पार पडेल. या बैठकीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे उपस्थित राहणार आहेत. (BJP Mumbai working commitee meeting for planning of upcoming BMC election)
सूत्रांच्या माहितीनुसार, या बैठकीत मुंबईतील भाजपच्या संघटनात्मक बांधणी आणि महानगरापालिका निवडणुकीच्या रणनीतीविषयी चर्चा होण्याची शक्यता आहे. संध्याकाळी पाच वाजता ही बैठक सुरु होईल. या बैठकीला मुंबईतील भाजपचे पदाधिकारी, नगरसेवक, आमदार आणि खासदार उपस्थित असतील. त्यामुळे आता या बैठकीत काय घडणार, याची उत्सुकता राजकीय वर्तुळाला लागली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. मध्यंतरीच्या काळात राज्यातील इतर निवडणुकांमध्ये शिवसेनेची घसरण झाली असली तरी आजवर सेनेचा मुंबई महानगरपालिकेचा किल्ला अभेद्य राहिला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या नाकावर टिच्चून महानगरपालिकेची आगामी निवडणूक जिंकायचीच, असा चंग यंदा भाजपने बांधला आहे. त्यामुळे मुंबई भाजप कार्यकारिणीच्या आजच्या बैठकीत काही महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत आक्रमक रणनीतीमुळे भाजपला चांगले यश मिळाले होते. शिवसेना आणि भाजपच्या संख्याबळात फारसे अंतर नव्हते. मात्र, त्यावेळी भाजपने आम्ही पहारेकऱ्याच्या भूमिकेत राहू असे सांगत महापौरपदाच्या शर्यतीमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आता शिवसेनेशी युती तुटल्यामुळे भाजप यंदाच्या महानगरपालिका निवडणुकीत अत्यंत आक्रमक प्रचार करेल, असा अंदाज आहे.
किरीट सोमय्यांचा शिवसेनेवर हल्लाबोल
भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकारपरिषद घेत शिवसेनेवर तीन मोठे घोटाळे केल्याचा आरोप केला होता. किरीट सोमय्या यांनी आरोप केलेल्या या तीन कथित घोटाळ्यांमध्ये दहिसर भूखंड घोटाळा, ठाकरे आणि नाईक कुटुंबीय जमीन व्यवहार आणि महापौर किशोरी पेडणेकर यांनी बनावट कागदपत्रांद्वारे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचा (SRA) लाभ घेतल्याच्या प्रकरणाचा समावेश आहे. आपण आता या सगळ्या घोटाळ्यांविरोधात उच्च न्यायालय आणि लोकायुक्तांकडे दाद मागणार असल्याचेही किरीट सोमय्या यांनी सांगितले होते.
संबंधित बातम्या:
आशिष शेलारांनी महापालिका निवडणुकीचं शंख फुंकलं, BMC वर झेंडा फडकवण्याची तयारी सुरु
ज्या पक्षाला मुंबईत अध्यक्ष मिळायची मारामारी, ते पालिकेच्या मिशनवर : आशिष शेलार
(BJP Mumbai working commitee meeting for planning of upcoming BMC election)