मुंबई : शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर गंभीर आरोप केले आहेत (BJP offer to Ajit Pawar). भाजपने अजित पवारांना अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद देण्याचं कबूल केलं असून त्यामुळेच अजित पवारांनी सत्तास्थापनेला पाठिंबा दिल्याचा गौप्यस्फोट राऊत यांनी केला (BJP offer to Ajit Pawar). त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. भाजपने शिवसेनेला दिलेलं आश्वसन पाळलं नाही, मात्र अजित पवारांना मुख्यमंत्री देण्याचं कबूल केलं, असंही संजय राऊत यांनी नमूद केलं.
संजय राऊत म्हणाले, “भाजपने अजित पवारांना अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद आणि 20 मंत्रिपदं देण्याची ऑफर दिल्याची बातमी मी ऐकली आहे. यात किती सत्य आहे हे मला माहिती नाही. मात्र, माध्यमांमधून मला ही माहिती मिळाली आहे. त्यामुळे अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाचे जे आश्वासन शिवसेनेला दिलं गेलं, ते पाळलं गेलं नाही. आता हेच अजित पवार यांना अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाचं आश्वासन देण्याचा व्यापार करत आहेत. हे खरं असंल तर काय सुरु आहे हे महाराष्ट्राची जनता पाहात आहे. राष्ट्रवादीच्या काही आमदारांना गुडगावमध्ये ठेवण्यात आलं, धमकावण्यात आलं, हरियाणात त्यांचं सरकार असल्याने बाहेर पोलीस ठेवण्यात आले.”
यशवंतराव चव्हाण यांनी बहुमत नसताना स्वतः राष्ट्रपतींना सरकार स्थापन करु शकणार नाही, असं स्पष्टपणे सांगितलं होतं. त्यांनी महाराष्ट्रात एक वेगळा संकेत प्रस्थापित केला होता. मात्र देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी बहुमत नसतानाही सत्ता स्थापन केली. यातून त्यांनी यशवंतराव चव्हाणांच्या महाराष्ट्राची बदनामी केली आहे, असंही मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं.
भाजपचे आमदारही आमच्याकडे येऊ शकतात. कारण भाजपमधील अनेक आमदार तसेही काँग्रेस-राष्ट्रवादीतूनच तिकडे गेले आहेत, असं म्हणत राऊत यांनी भाजपला टोला लगावला.