मुंबई : भाजप फोडाफोडीचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केल्यानंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपने संपर्क केलेल्या काँग्रेस आमदाराचं नाव जाहीर केलं आहे. नाशिकमधील इगतपुरी मतदारसंघाचे विजयी उमेदवार हिरामण खोसकर यांना भाजपने ऑफर दिल्याचा दावा (BJP offer to Congress MLA) वडेट्टीवारांनी केला आहे.
त्र्यंबकेश्वर मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार हिरामण खोसकर 31 हजार 678 मतांनी विजयी झाले होते. त्यांनी शिवसेनेच्या उमेदवार निर्मला गावित यांचा धक्कादायक पराभव केला. हिरामण खोसकर यांना 86 हजार 053 मते मिळाली, तर निर्मला गावित यांना 54 हजार 678 मते मिळाली होती.
काँग्रेसच्या आमदार राहिलेल्या निर्मला गावित यांनी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर शिवबंधन हाती बांधलं आणि इगतपुरीतूनच निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. सलग नऊ वेळा नंदुरबार मतदारसंघाचे लोकसभेत प्रतिनिधित्व केलेल्या माणिकराव गावित यांच्या त्या कन्या आहेत. निर्मला गावितही या मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकीटावर दोन टर्म आमदार होत्या.
शिवसेना आमदाराला भाजपकडून 50 कोटींची ऑफर : वडेट्टीवार
निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश करण्याचा धोका त्यांनी पत्करला होता. मात्र त्यांचं पक्षांतर जनतेला पसंत न पडल्यामुळे मतदारांनी काँग्रेस उमेदवाराला कौल दिल्याचं पाहायला मिळालं.
काही आमदारांशी संपर्क करुन प्रलोभन द्यायला सुरुवात झाली आहे. शिवसेनेच्या एका आमदाराला 50 कोटी रुपयांची खुली ऑफर दिल्याचं मी टीव्ही चॅनलवर पाहिलं. त्यानंतर आमच्या आमदारांनाही संपर्क करण्यात आला, असं विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत.
पक्षांतर करणाऱ्या 80 टक्के माजी आमदारांना पराभवाचा सामना करावा लागला. हा धडा सगळ्यांनी घेतला आहे. त्यामुळे पक्ष सोडण्याची आता कोणाची हिंमत होणार नाही, असंही वडेट्टीवार यांना वाटतं.
अशाप्रकारे मित्रपक्षाच्या आमदारावरच त्यांचा डोळा आहे. याचा अर्थ ते काहीही करु शकतात. त्यांनी आमच्या आमदारांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, ही गोष्ट 100 टक्के खरी आहे, असंही विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं.
हा सत्तेचा घोडेबाजार उघड झाला पाहिजे म्हणून मी आमदारांना सांगितलं फोन टॅप करा. हे पुरावे जनतेसमोर दाखवायचे आहेत, असंही वडेट्टीवार (BJP offer to Congress MLA) म्हणाले.