मुंबईः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नावाची घोषणा ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचा शपथविधी, या काळात उभ्या महाराष्ट्राला अनेक धक्के बसले. अनुभवी विश्लेषकांपासून कसलेल्या राजकारण्यांनाही बुचकाळ्यात टाकणाऱ्या घटना घडत गेल्या. काही समोर आल्या तर काही पडद्यामागे घडल्या. या घटनांची दृश्य इतकी वेगानं एकामागून एक सरकत होती की, त्यातील बारकावे टिपणंही कठीण होतं. याच दृश्यांपैकी एक दृश्य सध्या सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होतंय. देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्यातील हलक्या फुलक्या क्षणांचं. दोन्ही नेते एकमेकांवर नाराज असलेल्या बातम्या वारंवार येत आहेत. विधानपरिषद निवडणुकांपासून तर या दोघांतील संबंध अधिकच ताणले गेल्याचं बोललं जाऊ लागलं. तसं चित्रही दिसत होतं. पण काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शपथविधीसाठी भाजप आणि शिंदेसेनेचा ताफा राजभवनाकडे जात असताना चित्र काही औरच दिसलं…
काल राजभवनातील कालच्या एका दृश्यावरून पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील दुरावा, ताण कमी झाला की, काय असा अंदाज लावता येईल. देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, एकनाथ शिंदे, पंकजा मुंडे, अब्दुल सत्तार आदी सर्व मंडळी राजभवनातील लॉबीतून जात होती. यावेळी त्यांच्यात काय चर्चा सुरु होती हे अधिकृतरित्या कळू शकले नाही. मात्र देवेंद्र फडणवीसांनी काहीतरी गंमत केली आणि त्यांना प्रतिसाद म्हणून पंकजा मुंडेंनीही त्यांच्या हातावर टपली मारत प्रतिक्रिया दिली. या दृश्यात दोन्ही नेत्यांच्या चेहऱ्यावर अजिबात ताण नव्हता की परस्परांमधील नाराजी, स्पर्धेचा लवलेश. ही दृश्य कालपासून सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. पंकजा आणि फडणवीस यांच्यातील हे संबंध असेच खेळीमेळीचे राहू देत.. अशी भावना नेटकऱ्यांकडून व्यक्त होत आहेत. भावा-बहिणीतील हे नातं असं राहू देत, असं म्हटलं जात आहे..
ज्या प्रकारे हात धरला त्यावरुन अजूनही #सब_चंगा_सी!
भाऊ-बहिणी चे हे नाते असेच राहू देत!@Dev_Fadnavis @Pankajamunde pic.twitter.com/0HOWxSBfws
— Devashish Kulkarni (@AjaatShatrruu) June 30, 2022
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र भाजपमध्ये अनेकांना संधी मिळतेय. मात्र फडणवीसांशी ज्यांचं जमत नाही त्यांना पक्षात फार स्थान मिळत नाही, असंही म्हटलं जातं. यामुळेच राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीची उमेदवारीपासून पंकजांना दूर ठेवण्यात आलं, अशाही चर्चा होत होत्या. मात्र महाराष्ट्रात एकिकडे सत्तांतर होत होतं, तशा भाजपच्या महत्त्वाच्या नेत्यांच्या बैठका सुरु झाल्या. एवढे दिवस महाराष्ट्राच्या राजकारणापासून दूर असलेल्या पंकजा मुंडे पुन्हा एकदा भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकांमध्ये दिसू लागल्या. आता नव्या सरकारमध्ये पंकजांना महत्त्वाचं खातं मिळणार, असंही म्हटलं जात आहे. लॉबीत दिसणाऱ्या या दृश्याप्रमाणे सगळंच ऑलबेल असेल तर पंकजा पुन्हा एकदा महाराष्ट्रात अॅक्टिव्ह होऊ शकतात, ही शक्यताही नाकारता येत नाही.