मुंबई : विधानसभा निवडणुकीला युती सामोरी जाणार असल्याचं शिवसेना (Shivsena) आणि भाजप (BJP) या दोन्ही पक्षांचे नेते निक्षून सांगत आहेत. मात्र दुसरीकडे भाजपने स्वबळाची तयारी सुरु केल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील विधानसभेच्या (Maharashtra Assembly Election) सर्व 288 मतदारसंघांची चाचपणी भाजपने सुरु केल्याची माहिती आहे.
भाजपने 288 विधानसभा मतदारसंघात आपले प्रतिनिधी पाठवले आहेत. या मतदारसंघांमधील इच्छुकांची चाचपणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नुकत्याच झालेल्या भाजपच्या बैठकीत यासंबंधी निर्णय घेण्यात आला आहे.
प्रत्येक मतदारसंघातील संभाव्य उमेदवार कोण असू शकतो, त्या मतदारसंघात कोण प्रबळ दावेदार आहे, याची चाचपणी करत असल्याची कबुली भाजप आमदार गिरीश व्यास यांनी दिली आहे. उमेदवारांबाबतचं सर्वेक्षण सर्वच राजकीय पक्ष करतात, त्यात वावगं काहीच नाही, असंही व्यास म्हणाले. या सर्वेक्षणाच्या आधारे उमेदवार निश्चित करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, मुख्यमंत्री हा भाजपचाच असेल. मुख्यमंत्री कोण हा प्रश्न जनतेसमोर येण्याचा उद्भवत नाही, असंही गिरीश व्यास यांनी स्पष्ट केलं. युती असो वा महायुती देवेंद्र फडणवीसच पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, असा विश्वास व्यास यांनी बोलून दाखवला.
राज ठाकरेंविरोधात सूडबुद्धी नाही
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीने बजावलेल्या नोटिशीमागे भाजप सरकारची सूडबुद्धी नाही, असं गिरीश व्यास यांनी स्पष्ट केलं आहे. अंमलबजावणी संचलनालयाच्या कारवाईशी भाजपचा काहीही संबंध नाही, ईव्हीएमविरोधातील राज ठाकरेंच्या आंदोलनामुळे ही नोटीस पाठवल्याची चर्चा तथ्यहीन आहे, असं व्यास म्हणाले.
अमित शाह, देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात पुन्हा युती करण्यामागचा एक फॉर्म्युला निश्चित झाला आहे. मात्र ‘आमचं ठरलंय’ असं सूचक वक्तव्य करण्यापलिकडे उद्धव ठाकरे काही सांगत नाहीत. उद्धव ठाकरे यांनीही जिल्हानिहाय राजकीय समीकरणं जाणून घेतली होती. त्यामुळे शिवसेनाही विधानसभेची स्वबळाची तयारी सुरु करत असल्याच्या चर्चा होत्या.