नवी दिल्ली : आठवडाभराच्या अमेरिका दौऱ्यानंतर परतणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi Welcome) यांच्या स्वागतासाठी दिल्लीत हजारो कार्यकर्ते सज्ज आहेत. भाजपने मोदींच्या स्वागतासाठी (PM Modi Welcome) विविध कार्यक्रमांचं आयोजन केलंय. मोदींनी अमेरिकेत ज्या पद्धतीने देशाची शान वाढवली, पाकिस्तानचे वाभाडे काढले, त्या पार्श्वभूमीवर भव्य स्वागत होणार असल्याचं भाजपचं म्हणणं आहे. दिल्लीतील सातही खासदारांच्या उपस्थितीत रोड शोचं आयोजन करण्यात आलंय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतील पालम विमानतळावर दाखल होतील. त्यानंतर रात्री साडे आठ वाजता मोदींचा ताफा पालम विमानतळाहून निघेल आणि पंतप्रधान निवासस्थानी जाईल.
दिल्ली पोलिसांनीही या पार्श्वभूमीवर चोख बंदोबस्त ठेवला आहे. निम लष्करी दलाच्या नऊ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. दहशतवादविरोधी पथकही लक्ष ठेवून आहे. याशिवाय विविध सुरक्षा यंत्रणा कामात व्यस्त आहेत. ताफा जाणाऱ्या मार्गातील घरांवरही जवान उभे असतील.
मोदींचं विमानतळावर स्वागत करण्यासाठी 20 हजार कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याचं भाजपकडून सांगण्यात आलं आहे. यावेळी दिल्लीतील सर्व सात खासदार मोदींसोबत असतील.
मोदींकडून डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकेचे आभार
अमेरिकेतील हॉस्टनमधील कार्यक्रमाने मोदींच्या अमेरिका दौऱ्याची सुरुवात झाली. यावेळी त्यांनी विविध देशांच्या प्रमुखांसोबत द्विपक्षीय बैठका केल्या. संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी सय्यद अकबरुद्दीन आणि सर्व राजदुतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निरोप दिला.
संयुक्त राष्ट्र महासभेतील भाषणानंतर मोदींनी अमेरिकेतील कार्यक्रम आणि स्वागताबद्दल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार मानले. हाऊड मोदी कार्यक्रम अविस्मरणीय असल्याचं त्यांनी सांगितलं. हा कार्यक्रम ट्रम्प यांच्या उपस्थितीमुळे आणखी खास झाल्याचं मोदी म्हणाले.