मुंबई : काही दिवसांआधी भाजप आमदार प्रशांत बंब (Prashant Bamb) यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. यात ते एका सरकारी शाळेतील शिक्षकाशी आक्षेपार्ह भाषेत बोलताना दिसत होते. यावेळी त्यांनी शिक्षकांचा अपमान केला. त्यांनी माफी मागावी अशी मागणी होत होती. आता त्यांनी शिक्षक दिनाचं (Teachers Day) निमित्त साधत शिक्षकांचा सन्मान करणारी कृती केलीये. त्यामुळे त्यांचा एक व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे.
आज 5 सप्टेंबर आहे. सर्वत्र शिक्षकदिन साजरा केला जातोय. या दिवसाचं निमित्त साधतं त्यांनी शिक्षकांचा सत्कार केला आहे. आमदार प्रशांत बंब यांच्यावतीने शिक्षकांचे पूजन करण्यात आलं आहे. औरंगाबादच्या बजाजनगरमध्य राहणाऱ्या शिक्षिकेचं त्यांनी पूजन केलं आहे. दीपाली भगवान मकरंद असं या शिक्षिकेचे नाव आहे. शाल आणि श्रीफळ देऊन त्यांनी हा सत्कार केलाय. हात जोडत त्यांनी त्यांच्या कार्यप्रति आदर व्यक्त केलाय.
त्यांच्या कृतीवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. हेच शहाणपण आधी दाखवलं असतं तर परिस्थिती वेगळी असली असती. आधी अपमान करायचा आणि मग पाया पडायचं हे योग्य नाही, अश्या प्रतिक्रिया नेटकरी देताना दिसत आहेत.
काही दिवसांआधी आमदार प्रशांत बंब यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. यात ते एका सरकारी शाळेतील शिक्षकाशी आक्षेपार्ह भाषेत बोलताना दिसत होते. हा शिक्षक आमदार बंब यांना सरकारी शाळेत कशी दुरावस्था आहे, कोणकोणत्या समस्या आहेत, हे सांगत आहे. त्यावर आमदार बंब त्यांना आरेरावीची भाषा वापरताना दिसत आहेत. “मी काय बोलवं हे तुम्ही मला सांगू नका”, असं ते या शिक्षकाला ठणकावून सांगत आहेत. या शिक्षकाने आमदारांसमोर आपल्या समस्या मांडल्या. त्यावर “शाळेतली दुरावस्था बघून तुम्हाला लाज वाटत नाही का?”, असा प्रतिसवाल बंब करताना दिसत आहेत. हा शिक्षकही बंब यांना तुम्हाला या सगळ्याची लाज वाटायला हवी असं म्हणत आहे.