मुंबईः येत्या काळात शिवसेना (Shivsena) जम्मू काश्मीरची निवडणूक लढवणार असल्याचं वक्तव्य संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं आणि राजकीय टीका टिप्पण्यांना जोरदार सुरुवात झाली आहे. संजय राऊत यांनी आधी नगरसेवक म्हणून निवडून यावं आणि नंतर जम्मू काश्मीरमधील (Jammu Kashmir) निवडणुकांबाबत बोलावं, असं आव्हान भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी दिलंय. तर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनीही संजय राऊत यांनी जोरदार खिल्ली उडवली.
भाजप नेते प्रविण दरेकर म्हणाले, ‘ सरडा जसे आपले राजकीय रंग बदलतो तसे रंग संजय राऊत बदलत आहेत. आपले पक्ष प्रमुख पंतप्रधान व्हावे असे म्हणत होते… त्यांनी शिवसेनेची वाट लावली आणि त्यांच्या मनात काँग्रेस विषयी प्रेम दिसत आहे..संजय राऊत यांनी नगरसेवक निवडणुक लढवावी आणि मग काश्मीर बाबत बोलावे, अशी प्रतिक्रिया प्रविण दरेकर यांनी दिली.
तर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनीही संजय राऊतांची खिल्ली उडवली. संजय राऊत जम्मू काश्मीरच काय तर अमेरिकेच्या राष्ट्रपती पदाचीही निवडणूक लढवतील, एवढा कॉन्फिडन्स येतोच कुठून, असा सवाल शिरसाट यांनी केलाय.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी शिंदे-फडणवीस सरकारबद्दल मोठा दावा केलाय. हे सरकार अजून फक्त १५ ते २० दिवस टिकून राहिल.. येत्या शिवजयंतीच्या आत महाराष्ट्रात मोठी उलथापालथ होईल, असं वक्तव्य अमोल मिटकरी यांनी केलंय. त्यावरून भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली.
ते म्हणाले, अमोल मिटकरींचं हे वक्तव्य म्हणजे मुंगेरी लाल के हसीन सपने असे म्हणावे लागेल.. संजय राऊत यांनी तारखा दिल्या. त्याला सात महिने झाले… तरी सरकार पडले नाही..
सरकार पडणार असे करत करत आपले नेते जे जाऊ पाहतात त्यांना थांबवण्यासाठी हा प्रयत्न आहे, असा टोमणा प्रविण दरेकर यांनी लगावला.