पुणे: लोकसभा निवडणुकीत भाजपने (BJP) बारामती मतदारसंघ (Baramati Constituency) प्रतिष्ठेचा केला होता. आता विधानसभा निवडणुकीत देखील बारामती काबीज करण्यासाठी भाजपने व्यूहरचना आखली आहे. यावेळी भाजपचे संघाच्या (RSS) मदतीने बारामती जिंकण्याचे मनसुबे आहेत. त्यापार्श्वभूमीवर संघ आणि भाजपमध्ये बैठकांचा सिलसिला सुरू आहे.
शत प्रतिशत भाजपचा नारा देणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांचा पारंपारिक गड बारामती काबीज करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी भाजपचे जोरदार रणनिती आखली आहे. लोकसभेप्रमाणे विधानसभेतही पवार काका-पुतण्याची (Sharad Pawar – Ajit Pawar) कोंडी करण्यासाठी भाजपने रणनीती तयार केली आहे. ज्यामध्ये संघाचा मोठा सहभाग आहे.
लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या पराभवासाठी चद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी बारामतीत मुक्काम ठोकला होता. त्यावेळीही पवार काका-पुतण्याची भाजपने जोरदार कोंडी केली. आता विधानसभेत बारामती जिंकायची असेल, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मदत घ्यावी लागेल, असं भाजप नेत्यांचं म्हणणं आहे. यासाठी पुण्यात संघाच्या मोतीबागेतील कार्यालयात बैठका होत आहेत.
रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, भाजपचे काही स्थानिक नेते आणि संघाचे पदाधिकारी यांच्यात मंगळवारी बैठक झाली. यामध्ये बारामतीत कशा पद्धतीने यंत्रणा तयार करायची, उमेदवार कोण असणार यावर चर्चा झाली.
पवारांची बारामती सर करणं भाजपसाठी तितकं सोपं नाही. त्यामुळे संघाची मदत घेतली जात आहे. बारामती जिंकली नाही, तरी पवार काका-पुतण्यांची बारामतीत कोंडी करणे हाच खरा भाजपचा मुख्य उद्देश आहे. तो उद्देश लोकसभा निवडणुकीत यशस्वी झाल्याचे पाहायला मिळाले. भाजप संघाच्या मदतीने तशीच रणनिती विधानसभा निवडणुकीतही आखत आहे.