मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकांचं सत्र सुरु असताना, आज शिवसेना आणि भाजपच्या युतीवर शिक्कामोर्तब होणार आहे. कारण भाजप अध्यक्ष अमित शाह हे आज मुंबई दौऱ्यावर असून, ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेणार असल्याचं सांगण्यात येत आहे. अमित शहा आज संध्याकाळी पाच वाजता उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. अमित शाह हे अहमदाबाद येथून मुंबईला येणार आहेत, त्यानंतर ते उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. या भेटीनंतर अमित शहा आणि उद्धव ठाकरे रळीतील हॉटेल ब्लू सी इथे संध्याकाळी सहा वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. लोकसभेसाठी फिफ्टी-फिफ्टी फॉर्म्युल्यावर शिवसेना आणि भाजपामध्ये एकमत झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे अमित शाह आणि उद्धव ठाकरे आज युतीची अधिकृत घोषणा करणार आहेत.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील जागावाटपांवर दोन्ही पक्षांचे प्रमुख अंतिम शिक्कामोर्तब करतील. त्यानंतर शिवसेना आणि भाजपची संयुक्त पत्रकार परीषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत शिवसेनेकडून त्यांच्या अटी आणि शर्थी सविस्तर सांगण्यात येणार आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत युती विरुद्ध आघाडी असाच थेट सामना होणार आहे. मात्र मतदार राजा कुणाच्या पारड्यात आपलं मत टाकणार हे निकालाच्या दिवशीच स्पष्टं होईल.
युतीसाठी शिवसेनेच्या अटी काय आहेत?
1) लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला पालघर लोकसभा मतदार संघ देणार. त्यामुळे महाराष्ट्रातील 48 पैकी शिवसेना 23 तर भाजप 25 जागांवर उमेदवार उभे करणार.
2) विधानसभा निवडणुकीत 288 पैकी शिवसेना 144 आणि भाजप 144 असा फिफ्टी-फिफ्टी फाॅर्मुला असेल.
3) शिवसेनेनं ही युती फक्त भाजपशी केलेली आहे. भाजपच्या मित्रपक्षांशी नाही.
4) त्यामुळे भाजपच्या 144 जागांपैकी त्यांना मित्र पक्षांसाठी किमान 20 जागा सोडाव्या लागतील.
5) भाजपच्या मित्र पक्षांच्या जागेवर शिवसेना त्यांचे उमेदवार उभे करणार.
6) त्यामुळे विधानसभेत शिवसेना 164 पर्यंत उमेदवार उभे करु शकते.
7) युतीतील जागावाटपांबरोबरच राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरही शिवसेनेनं आग्रही भूमिका ठेवली आहे. युती करताना ही प्रमुख अट ही ठेवण्यात आली होती.
8) शेतकऱ्यांना 100% कर्जमुक्ती, त्यांच्या उत्पादित पीकांना हमीभाव आणि दुष्काळग्रस्त गावांत तात्काळ उपाययोजनांची अंमलबजावणी करणे.
मुख्यमंत्री मातोश्रीवर
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा चारच दिवसांपूर्वी स्वत: मातोश्रीवर जाऊन त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली होती. त्यावेळी युतीबाबत उद्धव ठाकरेंसोबत सकारात्मक चर्चा झाल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले होते.
संबंधित बातम्या
मुख्यमंत्री म्हणाले – युतीची चर्चा सकारात्मक, पण शिवसेनेचं म्हणणं काय?