आंध्र प्रदेश : स्थापना दिनाच्या दिवशीच भाजपने काँग्रेसला धक्का दिला होता. माजी संरक्षणमंत्री ए. के. अँटोनी यांचा मुलगा अनिल अँटोनी यांनी भाजपमध्ये प्रवेश करून काँग्रेसला धक्का दिला होता. अनिल अँटोनी यांना भाजपात प्रवेश देतानाच राहुल गांधी यांच्याविरोधात वायनाड मतदारसंघातुन लोकसभा उमेदवारी देण्याचे भाजपने संकेत दिले आहेत. त्यापाठोपाठ आज काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री यांनी भाजपमध्ये प्रवेश करून काँग्रेसला ‘जोर का झटका’ दिला आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीला एक वर्ष बाकी आहे. अशातच या माजी मुख्यमंत्री यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे येथील राजकीय समीकरणे बदलणार आहेत.
दक्षिण भारतातील आंध्र प्रदेश राज्याचे माजी मुख्यमंत्री किरणकुमार रेड्डी यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. रेड्डी हे अविभाजित आंध्र प्रदेशचे शेवटचे मुख्यमंत्री होते. 2014 साली तेलंगणाची निर्मिती झाली. त्यांनंतर त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.
मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसला सोड चिट्ठी देत स्वतःचा ‘जय समैक्य आंध्र’ हा पक्ष स्थापन केला होता. मात्र, 2018 मध्ये तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत त्यांनी पुन्हा पक्षात परतीचा मार्ग धरला होता. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला असला तरी काँग्रेसपासून फारकत घेऊ शकत नाही, असे ते त्यावेळी म्हणाले होते.
सध्या आंध्र प्रदेशमध्ये मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली वायएसआर काँग्रेसची सत्ता आहे. तर, विधानसभा निवडणूकीसाठी एक वर्षाचा कालावधी बाकी आहे. अशावेळी किरणकुमार रेड्डी यांनी पुन्हा काँगेससोबत फारकत घेतली आहे.
कॉंग्रेस नेतृत्वासोबत झालेल्या वादामुळे त्यांनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला असे बोलले जात आहे. काँग्रेस पक्ष जनतेचा कौल समजू शकलेला नाही. पक्ष नेत्तृत्वाला काय चुकीचे आहे हे कळत नाही. झालेल्या चुकीचे विश्लेषण करत नाहीत किंवा झालेली चूक दुरुस्त करण्याचा निर्णयही घेत नाहीत, अशी टीका किरणकुमार रेड्डी यांनी राहुल गांधी यांच्यावर केली.
फक्त आपणच बरोबर आहोत बाकीचे चूक आहेत असे पक्ष नेतृत्वाला वाटत आहे. याच विचारसरणीमुळे पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. हायकमांडच्या चुकीच्या निर्णयांमुळे पक्षाची वाताहत होत आहे. ही एका राज्याची बाब नाही. माझा राजा खूप हुशार आहे, तो स्वतः विचार करत नाही आणि कोणाच्या सूचना ऐकत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला होता.
आगामी विधानसभा निवडणूक होण्यासाधीच किरणकुमार रेड्डी यांच्या पक्ष प्रवेशामुळे भाजपला राज्यात बळ मिळाले आहे. तर, काँग्रेससाठी हा जोर का झटका मानण्यात येत आहे. तर, दक्षिण भारतातील राज्यात विस्ताराची अपेक्षा असणाऱ्या भाजपला मात्र प्रवेश फायद्याचे ठरणार असल्याचे बोलले जात आहे.