भोपाळ : राजकारणात कोणत्या गोष्टीचा फायदा कुणाला होईल याचा काही नेम नाही. मध्य प्रदेशातही असंच झालंय. काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ला असला तरी विधानसभेत मात्र काँग्रेस सध्या तरी सुरक्षित आहे. मध्य प्रदेशचे रतलाममधील आमदार खासदार झाल्यामुळे काँग्रेसला फायदा झालाय. भाजपचा एक आमदार कमी झाल्यामुळे काँग्रेसची स्थिती काही प्रमाणात मजबूत झाली आहे.
आमदार जीएस दामोर यांना लोकसभा निवडणुकीचं तिकीट देण्यात आलं होतं. दामोर यांची संसदेवर निवड झाल्यामुळे त्यांना आमदारकीचा राजीनामा द्यावा लागेल. त्यांनी राजीनामा दिल्यास 230 सदस्यसंख्या असलेला आकडा 229 वर येईल. जास्तीत जास्त सहा महिन्यांपर्यंत ही परिस्थिती राहू शकते. सहा महिन्याच्या आत पोटनिवडणूक घेतली जाते. दुसरीकडे झाबुआ मतदारसंघात विधानसभेची पोटनिवडणूक बाकी आहे. काँग्रेसकडे सध्या 115 आमदार आहेत. त्यामुळे काही दिवसांसाठी का होईना अस्थिरतेचा धोका टळला आहे.
काँग्रेसचे आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा भाजपकडून सातत्याने केला जातोय. 229 वर संख्याबळ आल्यामुळे काँग्रेसची स्थिती आणखी मजबूत झाल्याचं भाजप नेतेही मान्य करतात. तर विरोधी पक्ष नेते गोपाल भार्गव यांनी अनेकदा सरकार पाडण्याचा इशारा दिलाय. पण तूर्तास आम्हाला कोणतीही घाई नसल्याचंही ते म्हणाले.
आमदार असताना संसदेत निवड झाल्यानंतर आमदारकी किंवा खासदारकी यापैकी एक निवडणं गरजेचं असतं. रतलामचे आमदार यापैकी काय निवडतील यावरही भाजप नेत्याने उत्तर दिलं. राज्यातच राहण्याची आता कोणतीही शक्यता नाही. कारण काँग्रेसवाले अगोदरच घाबरलेले आहेत. आम्हाला काहीही करण्याची गरज नाही. त्यांच्यातच अंतर्गत वाद चालू आहेत आणि एक दिवस सरकार आपोआप पडणार आहे, असं एका भाजप नेत्याने सांगितलं.