नजीर खान, परभणीः लोकसभा (Loksabha Election) आणि विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) पार्श्वभूमीवर भाजपाचे एक-एक डावपेच स्पष्ट होत आहेत. मराठवाड्यात भाजपाची (BJP) एक मोठी खेळी दिसून आली. अनेक वर्षांपासून युती असलेल्या राष्ट्रीय समाज पार्टी अर्थात रासपा या पक्षाशी असलेले संबंध मोडीत काढण्याचा भाजापाचा विचार दिसतोय. गंगाखेडमध्ये काल केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि डॉ. भागवत कराड यांच्या उपस्थितीत झालेल्या सोहळ्यात भाजपाने या जागेवर दावाही ठोकला. नवा उमेदवारही घोषित केला.
रासापाचा सध्या महाराष्ट्रात एकमेव आमदार आहे. गंगाखेडचे रत्नाकर गुट्टे. भाजपाच्या या घोषणेमुळे रासपाच्या आमदारासमोर मोठं आव्हान निर्माण झालंय. गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्याविरोधात भाजापाने नवा उमेदवार जाहीर केलाय. भाजपच्या राज्य कार्यकारिणी सदस्य असलेले संतोष मुरकुटे यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपकडून शुक्रवारी गंगाखेडात मोठं शक्तिप्रदर्शन करण्यात आलं.
आधी शिवसेनेत असलेले संतोष मुरकुटे गेल्या अनेक वर्षांपासून भाजपाचे सक्रिय सदस्य आहेत. संतोष अनेक वर्षांपासून चांगलं काम करतोय, त्याच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होवोत, त्याला जनतेची सेवा करण्याची संधी मिळो, असं वक्तव्य डॉ. भागवत कराड यांनी या कार्यक्रमात बोलताना केलं. म्हणजेच गंगाखेड विधानसभा मतदार संघातून संतोष मुरकुटे यांना उमेदवारी देण्याचं भाजपने निश्चित केलेलं दिसतंय..
केंद्रीय मंत्र्याच्या या वक्तव्यामुळे भाजपा-रासपाची अनेक वर्षांपासूनची युती मोडीत निघणार असं चित्र आहे. महादेव जानकर आणि देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे संबंध आहेत. मात्र गंगाखेडमध्ये भाजपाने दावा ठोकल्यामुळे यात बिघाड होण्याची शक्यता आहे.
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थमंत्री डॉ.भागवत कऱ्हाड आणि भाजपचे नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी कार्यक्रमाला हजेरी लावत भाषणे ठोकली. मात्र या कार्यक्रमानंतर महादेव जानकारांच्या पक्षाचे आणि भाजपचे संबंध चांगले राहिले नाहीत, असं एकूण चित्र समोर आहे. देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय मानले जाणारे रासपाचे विद्यमान आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्यासाठी येणारे दिवस आव्हानात्मक असू शकतात.