मुंबई : राज्यात सध्या सत्ता बदलाची चर्चा आहे. एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) बंडामुळे महाविकास आघाडी अल्पमतात आलेलं आहे. अश्यात आता एकनाथ शिंदेंच्या पाठिंब्यामुळे राज्यात भाजपचं (BJP) सरकार अस्तित्वात येईल, असं बोललं जातंय. भाजपच्या नेत्यांनी तर मनोमन सत्तेची स्वप्न पाहिली आहेत. भाजपच्या एका नेत्याने येत्या रविवारपर्यंत राज्यात भाजपचं सरकार स्थापन होणार असल्याचा दृढ आत्मविश्वास व्यक्त केला आहे.
भाजपच्या नेत्यांना सध्या पुन्हा एकदा फडणवीस सरकार राज्यात अस्तित्वात येईल, अशा आशावाद आहे. “जर सगळं काही सुरळीत झालं. तर येत्या शनिवारी किंवा रविवारी राज्यात नवीन सरकार स्थापन होईल, अशी आमची अपेक्षा आहे”, असं भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितलं आहे.
सेनेत पडलेली उभी फूट आणि एकनाथ शिंदे यांची भाजपकडे असलेली ओढ पाहता लवकरच भाजप सरकार सत्तेत येईल, असा विश्वास व्यक्त केला जातोय. “शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे स्वतः शिवसेना विधिमंडळ पक्षाचे नेते आहेत. त्यांनी दावा केला आहे की तेच शिवसेनेचे विधानमंडळ पक्षाचे नेते आहेत. खरी शिवसेना शिंदे गटच आहे. त्यामुळे भाजप सरकार येण्याची आशा बळावली आहे”, असं या वरिष्ठ नेत्याने म्हटलंय.
एकीकडे भाजपचं सरकार सत्तेत येणार अशी चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होतेय. आज राज्य मंत्रिमंडळाची तातडीची मंत्रिमंडळ बैठक बोलवण्यात आली आहे. दुपारी अडीच वाजता मंत्रिमंडळाची बैठक पार पडेल. ठाकरे सरकारची ही शेवटची कॅबिनेट ठरणार का याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. बंडखोरीच्या पार्श्वभूमीवरती आजच्या कॅबिनेट बैठकीला महत्त्व प्राप्त झालंय. शिवसेना आमदारांच्या बंडखोरीनंतर झालेली ही दुसरी कॅबिनेट बैठक आहे. कालच (सोमवार, 27 जून) कॅबिनेटमधील खात्यांमध्ये फेरबदल करण्यात आले होते. त्यानंतर आज होणारी ही पहिलीच कॅबिनेट बैठक असणार आहे. या बैठकीमध्ये नेमके काय महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जातात, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.